• Mon. Jul 21st, 2025

ठेकेदाराच्या धमक्यामुळे आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरागत मासेवारीवर निर्बंध

ByMirror

Feb 9, 2024

घोडच्या पात्रात आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारी करु देण्याची मागणी

भिल्ल समाज बांधवांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- परंपरागत मासेवारीवर उपजीविका भागविणारे आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी अडथळे आणून त्यांना धमक्या देणाऱ्या ठेकेदार व संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, सागर कचरे, संपत पवार, शहराध्यक्ष फिरोज शेख, शहर प्रभारी शहानवाज शेख, विठ्ठल म्हस्के, सलिम अत्तार आदींसह आदिवासी भिल्ल समाज बांधव उपस्थित होते.


वडगाव शिंदोडी (ता. श्रीगोंदा) घोड धरणा शेजारी मोठ्या संख्येने राहत असलेले आदिवासी भिल्ल समाज परंपरागत पध्दतीने मासेमारी करुन आपली उपजीविका भागवत आहे. हा समाज भूमिहीन असल्याने व उपजीविकेचे साधन नसल्याने घोड धरणामध्ये मासेमारी करत आहे. मात्र या धरणातील ठेकेदार मासेमारी करण्यापासून त्यांना रोखत आहे व जीवे मारण्याची धमकी देत आहे. मासेमारी करताना त्यांचे साहित्य फेकून देण्यात येत आहे. तर बंदुकाचा धाक दाखविला जात असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


संबंधित ठेकेदार हा राजकीय पुढाऱ्यांचा कार्यकर्ता असल्याने तो राजरोसपणे मासेमारी करु न देता सर्वांना धमकावत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी परवानगी द्यावी, अन्यथा हा ठेका समाजबांधवांना देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *