समाजातील भेदभाव संपविण्यासाठी करण्यात आली जागृती
समाजातील सर्व स्तरावर समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधान महत्वपूर्ण -ॲड. महेश शिंदे
नगर (प्रतिनिधी)- समाजातील सर्व स्तरावर समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी संविधान महत्वपूर्ण आहे. भारतातील घटनात्मक तरतुदी आणि विविध कायदे भेदभाव निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 14 ते 18 अंतर्गत समानतेचा अधिकार दिला आहे. तो कोणात्याही प्रकारचा भेदभावाविरुद्ध संरक्षण प्रदान करतो. तसेच शिक्षण, रोजगार आणि सार्वजनिक सेवांमध्ये समान हक्क मिळावे यासाठी विविध कायदे लागू करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष तथा नोटरी पब्लिक ॲड. महेश शिंदे यांनी केले.
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र, जय युवा अकॅडमीच्या वतीने शून्य भेदभाव व वन्यजीवांचे महत्त्व या विषयावर काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज व भीमा गौतमी वसतीगृहात आयोजित कार्यशाळा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. शिंदे बोलत होते. या कार्यशाळेसाठी डॉ. वर्षा डोंगरे, प्रा. किरण वैराळ, अधिक्षीका रजनी जाधव, कांतीलाल पाटोळे, दिनेश शिंदे, गायत्री गुंड, रजनीताई ताठे, कांचन लद्दे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
प्रशिक्षक कांतीलाल पाटोळे म्हणाले की, आपल्या विचारसरणीमध्ये बदल करून समानतेची मूल्ये आत्मसात केली पाहिजे. सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. सार्वजनिक धोरणात सहभाग घेतला पाहिजे. माध्यमांचा वापर सकारात्मक बदल घडविण्यासाठी करावा. भेदभावाविरुद्ध आवाज उठविण्याचे त्यांनी आवाहन केले.
दिनेश शिंदे यांनी समता आणि न्याय यांची रुजवण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. शिक्षणाने कायदेशीर साक्षरता आणि सामाजिक जाणीव यांचा प्रसार केल्यास भेदभाव संपविता येणार असल्याचे सांगितले. प्रशिक्षिका कांचन लद्दे यांनी पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र काही विकृतांकडून पृथ्वीवरील दुर्मिळ वृक्ष, प्राणी, झाडांच्या प्रजातींची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. जागतिक पातळीवर नागरिकांचे जीवन, जल आणि जंगलावर अवलंबून आहे. सर्वत्र लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वन्यजीव आणि जैवविविधतेवर आधारित संसाधनावर अवलंबून असतात याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेचे संयोजन सूत्रसंचालन गायत्री गुंड यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, कार्यक्रमाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी मेडिकल कॉलेजचे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.