• Mon. Nov 3rd, 2025

शहरात झालेल्या इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेला जिल्ह्यातील उद्योजकांचा प्रतिसाद

ByMirror

Oct 14, 2023

औद्योगिक विकासासाठी शहरात जिल्हा निर्यात वृद्धी केंद्र लवकरच कार्यान्वित होणार -जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ

अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक वाढीच्या दृष्टीकोनाने फायनान्स, सॉफ्टवेअर, स्किल मॅन पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनाने कार्य सुरु झालेले आहे. स्किल मॅन पॉवरची कमतरता भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील युवकांसाठी इतर मोठ्या औद्योगिक शहरांप्रमाणे पोषक वातावरण निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याचे स्पष्ट करुन, जिल्हा निर्यात वृद्धी केंद्र लवकरच अहमदनगर येथील जिल्हा उद्योग केंद्रात कार्यान्वित होणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. तर उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी सर्वपरीने सहकार्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगरच्या वतीने आयोजित इग्नाईट महाराष्ट्र उपक्रमांतर्गत इंडस्ट्री-गव्हर्मेंट नेटवर्किंग फॉर इन्क्लुझिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ॲण्ड इन्फॉर्मेशन महाराष्ट्र एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, नाशिक विभाग उद्योग सह संचालक शैलश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अहमदनगरचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, आयडीबीआयचे मुकुंद तिवारी, एन.एन. सुर्यवंशी, सिडबीचे शंतनू श्रीवास्तव, बँक ऑफ महाराष्ट्रचे नंदन नंबीर, एस.व्ही. आमलेकर, डी.वाय. नागपुरे, के.डी. गिरोला, प्रकाश गांधी, सुरज जाधव, हर्षद बरगे, सुनिल हजारे आदींसह जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, जिल्ह्याचा जीडीपी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याला सरकारकडून टार्गेट देण्यात आले असून, 2047 पर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. जिल्ह्यातील उद्योग-व्यवसाय बरोबरच विविध विभागाचा जीडीपीमध्ये सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे. तीन टप्प्यात विभागणी करून शॉर्ट टर्म व लॉन्ग टर्म आराखडा करण्यात आला आहे. भारत जगाच्या स्पर्धेत शिखर गाठत असताना या विकासात्मक योगदानात प्रत्येक जिल्ह्याचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसायाला मोठी संधी असून, येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढून अनेक औद्योगिक भरभराटीकडे वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


हॉटेल यश ग्रॅण्ड येथे दीपप्रज्वलनाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल दवंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात शैलेश राजपूत यांनी औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इग्नाईट महाराष्ट्र प्रकल्पाची माहिती दिली.


अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने आपले स्थान निर्माण केले आहे. मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पाहण्याचा जगातील औद्योगिक व्यवसायिकांचा दृष्टीकोन आहे. या विकासात्मक वाटचालीत महाराष्ट्रने देखील महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. भविष्यात अहमदनगर शहराचा जिल्ह्याचा औद्योगिक व्यवसाय कुठे असेल? याचा आराखडा तयार केला जात आहे. येणारा काळ हा जिल्ह्यासाठी भरभराटीचा असणार आहे. जिल्ह्याची भौतिक, शिर्डी विमानतळ, रेल्वे मार्ग व समृद्धी महामार्गासह अनेक महार्मागांनी जोडलेला या जिल्ह्यातील औद्योगिक व्यवसाय वाढीला चालना देणारा ठरणार असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री यांनी घोषणा केलेल्या वडगाव गुप्ता येथील जमीनीच्या माध्यमातून उद्योजकांच्या जागेचा प्रश्‍न देखील सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उपस्थित पाहुण्यांची औद्योगिक विकासावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले. आभार बालाजी बिराजदार यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *