भाजपच्या जाती-धर्माच्या भिंतीला उत्तर म्हणून, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल कम्युनिस्ट बांधत आहे -कॉ.डॉ. राम बाहेती
नवीन कामगार संहिता रद्द करावा व अल्पसंख्यांक समाजावर उघडपणे सुरु असलेल्या दहशतीला पायबंद घालण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- माणसे एकत्र राहून सत्तेविरोधात बंड करू नये, यासाठी सत्ताधारी भाजप सरकार जाती-धर्माच्या भिंती निर्माण करत आहे. मात्र श्रमिक, माणसाला माणूस म्हणून जोडणारा पूल बांधण्याचे काम कम्युनिस्ट करत आहे. जाती-जातीत व धर्मा-धर्मात भांडणे लावून एकमेकांना तोडण्याचे काम सुरु असून, जनतेला श्रमिक, कष्टकरी या एका झेंड्याखाली आणण्याचे कार्य लाल बावट्याची चळवळ करत आहे. जाती-धर्माच्या भिंती उभ्या राहत नाही, तोपर्यंत त्यांचे राजकारण पुढे जाणार नाही. सर्वसामान्यांनी हे राजकारण समजावून घेऊन माणसाला माणसांशी जोडणारा पूल मजबूत करण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.डॉ. राम बाहेती यांनी केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. यावेळी बाहेती बोलत होते. यावेळी भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशाप्रसंगी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे, आप्पासाहेब वाबळे, कॉ. बाबा आरगडे, कॉ. बबनराव सालके, जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते, जिल्हा सहसचिव कॉ.सुधीर टोकेकर, संतोष खोडदे, कॉ. भारती न्यालपेल्ली, ज्ञानेश्वर सहाणे, कॉ. महेबुब सय्यद, कॉ. अनंत लोखंडे, अशोक सब्बन, कॉ. कारभारी उगले, कॉ. भगवान गायकवाड, ॲड. ज्ञानदेव सहाणे, कॉ. सुभाष ठुबे आदींसह व पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून 250 प्रतिनीधी सहभागी झाले होते.
पुढे बाहेती म्हणाले की, सत्ताधारी भाजप एक नंबरचा शत्रुपक्ष म्हणून कम्युनिस्ट व लालबावटाकडे पाहत आहे. तत्त्वांशी तडजोड न करणारे कॉम्रेड त्यांच्या गळाला लागत नाही. त्यांना कसेही वळवता येत नाही यासाठी त्यांच्यासाठी कम्युनिस्ट शत्रू ठरत आहे. देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी सर्व समाज घटक त्रस्त आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी जाती-धर्मावरून राजकारण केले जात आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य, श्रमिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम कम्युनिस्ट पक्ष करत आहे. कम्युनिस्ट यांनी आजपर्यंत केलेल्या अनेक आंदोलनातून सर्वात जास्त लाभ हिंदू समाजाला झाला, मात्र कम्युनिस्टांनी कधीही हिंदुत्वाचे नाव पुढे केले नाही. गोरगरिबांच्या नावाने आपला संघर्ष सुरु ठेवला. संविधान बदलून हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 400 पार च्या घोषणा लोकसभेच्या निवडणुकीत देण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.
1978 साली व नंतर पुन्हा संघर्ष करून 1991 पर्यंतचे सर्व अतिक्रमणे नियमाकुल करण्याचा शासन निर्णय सरकारला काढावा लागला. कम्युनिस्टांनी लढले तर मिळते! हे दाखवून दिले. 2025 पर्यंतचे सर्व अतिक्रमणे नियमित करा, ही कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे. शेतकरी, शेतमजूर यांचे प्रश्न तीव्र झाले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले. अल्पसंख्यांक, दलित समाजाला टार्गेट केले जात आहे. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावले जात आहे.
भांडवलदारांच्या शाळा चालण्यासाठी सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. सर्वसामान्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान आहे. या सर्व घटकांवर होणाऱ्या हल्लेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष निर्भीडपणे आवाज उठवत असल्याचेही बाहेती म्हणाले. तर जनता सुरक्षा विधेयक ब्रिटिश सरकारची पुनरावृत्ती असून, ज्याला भगतसिंग यांनी विरोध केला होता. तो कायदा सरकार विरोधात असलेल्या आंदोलन, चळवळीला दडपण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनाच्या प्रारंभी पक्षाचा लाल ध्वज फडकावून त्याला सलामी देण्यात आली. या अधिवेशनात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, नवीन कामगार संहिता रद्द करावा, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी कायदा करावा, अल्पसंख्यांक समाजावर उघडपणे सुरु असलेली दहशतीला पायबंद घालावा, मॉबलिंचिगच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, या मागण्या संदर्भात ठराव घेण्यात आला. लाल बावटे की जय… , लाल झेंडे की जय… लाल सलाम! च्या घोषणांनी सभागृह दणणाले.
प्रास्ताविकात बन्सी सातपुते यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई कम्युनिस्ट पक्ष करत आहे. मागील तीन वर्षात कोठे होते व पुढील तीन वर्षात कुठे मार्गक्रमण करायचे? याचा आढावा व नियोजन वैचारिक पक्ष परिषदेत होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन यांनी शेतकरी संरक्षण कायदा आणावा व परदेशात शेतकरी यांना विविध कायद्याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संरक्षणाची माहिती दिली.
कॉ. ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, सत्ताधारी स्वतःचे हित साधण्यासाठी जाती-जाती व धर्मावरून झुंजवण्याचे काम करत आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासन पूर्ण करण्याऐवजी जाती-धर्माचे मुद्दे उपस्थित करुन प्रमुख प्रश्नांना बगल दिली जात आहे. जन सुरक्षा विधेयक हे अर्बन नक्षलच्या नावाखाली चळवळी दडपण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. अनंत लोखंडे यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन पोटाचे प्रश्न मांडावे लागतील, तेव्हा या धर्मांध शक्तीचे पतन होणार असल्याचे सांगितले. कॉ. महेबुब सय्यद यांनी कम्युनिस्ट यांनी स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी मोठे बलिदान दिले. आज सत्ताधारी देश प्रेमाचा खोटा बुरखा पांघरला आहे. सर्व माणसांचे रक्त लाल असते, त्याला कोणताही भगवा, हिरवा, निळा रंग नसतो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले. आभार संतोष खोडदे यांनी मानले.