अतिक्रमण काढण्यासाठी 15 मीटरचे अंतर कमी करून 10 मीटर करण्याचा निर्णय
नगर (प्रतिनिधी)- चांदा ग्रामपंचायत (ता. नेवासा) यांची मासिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत 15 मीटरचे अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली नोटीसचा प्रश्न चांगलाच गाजला. याच मुद्द्यावर गावाच्या सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर करुन चांदा गावठाण हद्दीमध्ये 15 मीटरच्या ऐवजी 10 मीटरचे अतिक्रमण काढले जावे. यामुळे गावातील नागरिकांच्या घरांची सुरक्षा कायम राहील आणि त्यांना बेघर होण्यापासून वाचवता येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित केले.
प्रभाग क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य समद रज्जाक शेख यांना त्यांचे बंधू शेख शकुर यांनी गावातील स्थानिक व स्वतःच्या मालकी असलेल्या जागेतील लोकांना 15 मीटर चे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याबाबतची नोटीस ही स्थानिक व मालकीच्या जागा असलेल्या लोकांवर अन्याय करणारी आहे, असे सुचविले. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्य शेख समद यांनी सदर विषय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत प्रभावीपणे मांडला. तर सर्व सदस्यांना सदर बाब ही आपल्या गावातील स्थानिक लोकांवर स्वतःच्या मालकी असलेल्या लोकांवर अन्याय करणारी आहे. यामुळे अनेक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येतील. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न हिरावून घेतला जात आहे. यापैकी काही कुटुंब चांदा ग्रामपंचायत यांच्या मार्फत प्रधान मंत्री आवास योजनेतील लाभार्थी असून, एकीकडे शासन गरिबांना घर देत आहे व दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लोकांना बेघर करण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
यासंदर्भात सरपंच सुनंदाताई दहातोंडे यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवून ग्रामपंचायत सदस्यांच्या संमतीने चांदा गावठाण हद्दीमध्ये 15 मीटरचे अंतर कमी करून त्याऐवजी 10 मीटर अंतर करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. या ठरावास बाळासाहेब दहातोंडे सुचक असून, समद रज्जाक शेख यांनी अनुमोदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गावातील नागरिकांचे 15 मीटर पर्यंतचे अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा दिल्या आहेत. सदर कारवाई झाल्यास गावातील अनेक नागरिकांचे राहते घर उध्वस्त होणार असून, अनेक कुटुंब बेघर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.