गावातून कॅण्डल मार्च काढून आरक्षणाची मागणी; इतर समाजही आंदोलनात सहभागी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुरुडगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर गावात कॅन्डल मार्च काढून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देऊन तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे 25 ऑक्टोबर पासून उपोषण सुरू झालेले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावागावात आंदोलन होत असून, मराठा समाजाच्या तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहे. बुरुडगावात सरपंच, उपसरपंच व सर्व 11 सदस्यांच्या राजीनामा सत्रानंतर संध्याकाळी निषेध सभा घेण्यात आली. यावेळी बुरुडगाव महिला बचत गट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातून ग्रामस्थांनी कॅण्डल मार्च काढला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा… अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. मराठा आरक्षणासाठी गावातली महिलाही आक्रमक झाल्या असून, त्यांनी देखील आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. मराठा आरक्षणासाठी गावागावात लढा तीव्र होत असताना, बुरुडगाव ग्रामस्थांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी तसेच कोणत्याही प्रकारची राजकीय सभा होऊ देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनात मराठा समाजासह इतर समाज देखील सहभागी झाला होता. निषेध सभेत सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कुलट, सोनू शिंदे व प्रा. डॉ. संतोष यादव यांचे भाषणे झाली.

बुरुडगाव ग्रामपंचायतमध्ये 11 सदस्य असून, लोकनियुक्त सरपंच यांच्यासह सर्वच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सरपंच अर्चना कुलट यांच्यासह उपसरपंच महेश निमसे, ग्रामपंचायत सदस्य सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले, अक्षय चव्हाण, नैना दरंदले, शितल ढमढेरे, रुक्मिणी जाधव, रंजना कुलट, दिलीप पाचरणे, शालनबाई क्षेत्रे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
