• Sun. Jun 1st, 2025

वाहतूक शिस्त व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे निवासी प्रशिक्षणाला आजपासून प्रारंभ

ByMirror

May 20, 2025

आरएसपी अधिकारी प्रशिक्षणाचा पोलीस मुख्यालयात 10 दिवसांचे व्यापक प्रशिक्षण


वाहतूक सुरक्षा ते प्रथोमोपचार दिले जाणार धडे

नगर (प्रतिनिधी)- सद्यस्थितीत वाढत्या रस्ते अपघातांची गंभीरता लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मनात वाहतुकीच्या शिस्तीची रुजवण आणि आपत्कालीन प्रसंगी स्वसंरक्षणाचे भान निर्माण व्हावे, यासाठी बुधवार (दि. 21 मे) पासून आरएसपी (रस्ता सुरक्षा पथक) अधिकारी निवासी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.


हे निवासी प्रशिक्षण 30 मे पर्यंत चालणार असून, शिक्षकांसाठी 10 दिवसांचे विभागस्तरीय प्रशिक्षण यामध्ये घेतले जात आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच वाहतुकीचे नियम, ट्राफिक सेन्स, स्वसंरक्षणाबरोबरच नागरी संरक्षण, पदकवायत, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन व प्रथोमोपचार यासारख्या अत्यावश्‍यक विषयांबाबत सुसज्ज व जागरूक करणे हा आहे.


महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षण व गृह (पोलीस) विभागाच्या अंतर्गत, महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना-नागपूर व नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण अहिल्यानगर शहरातील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आले आहे.


हे प्रशिक्षण जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या नियंत्रणा खाली पार पडणार आहे. प्रशिक्षणाचे नियोजन महाराष्ट्र राज्य आरएसपी ॲण्ड सीडी, नाशिक विभागाचे प्रशिक्षण प्रमुख सिकंदर अ. शेख, राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी व वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्याध्यक्ष संजय शेंडे, उपाध्यक्ष पितांबर महाजन, प्रशिक्षणाधिकारी सोमनाथ बोंतले, तज्ञ सल्लागार लेखाधिकारी मनोज शिंदे, कार्याध्यक्ष विजयकुमार पोकळे, तसेच प्रकाश मिंड, एकनाथ लगड, राज धस, तुकाराम हरळ, भारत धाडगे, अनुराधा माने व जिल्हा कार्यकारिणी सदस्य हे सर्वजण परिश्रम घेत आहेत. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षा, जबाबदारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे भान निर्माण करून त्यांना सजग व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी निश्‍चितच मोलाची भूमिका बजावणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *