तहसीलदारांचा आदेश असताना व एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष
रस्ता खुला होण्यासाठी 22 फेब्रुवारी पासून उपोषण करण्याचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- तहसीलदारांचा आदेश होऊनही घोगरगाव (ता. नेवासा) येथील गट नंबर 255 मधील रस्ता खुला केला जात नसून, या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असताना प्रशासनाने याची गांभार्याने दखल घेऊन सदर रस्ता खुला करुन देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्यासह पिडीत कुटुंबीयांसह शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर रस्ता खुला न झाल्यास 22 फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, उपसरपंच हर्षल कांबळे, माया जाधव, सतीश साळवे, शिवाजी शिरोळे, दीपक चांदणे, प्रमोद घोडके, गं.भा. शकुंतला कणगरे, किरण कणगरे, सतीश कणगरे, संदेश कणगरे, प्राची कणगरे, प्रीती कणगरे आदींसह कणगरे कुटुंबीय उपस्थित होते.
घोगरगाव (ता. नेवासा) येथील गट नंबर 255 मधील रस्ता खुला होण्यासाठी गं.भा. शकुंतला कणगरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात शुल्क भरुन पोलीस बंदोबस्त घेतला होता. मात्र समोरील लोकांनी पोलिसांसमोर कणगरे कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली. तर पोलिसांना देखील दमबाजी करण्यात आली. मात्र पोलिसांनी काही एक कारवाई न करता तेथून निघून गेले. तहसीलदार नेवासा यांनी या ठिकाणी भेट देऊन रस्ता अडविणाऱ्या लोकांना समज दिली. परंतु आजपर्यंत रस्ता खुला झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडळ अधिकारी गटविकास अधिकारी यांनी रस्ता खुला न करता कागदोपत्री पंचांच्या सह्या घेऊन रस्ता खुला केल्याचे रेकॉर्ड तयार केले आहे. त्याच रस्त्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून रस्ता मंजूर आहे. परंतु गावातील सरपंच, ग्रामसेवक रस्ता करत नाही. सरपंच त्या लोकांचे नातेवाईक असल्याने हा रस्ता खुला होऊ दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित कुटुंबियांनी वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये 24 ऑक्टोंबर व 5 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. किरण कणगरे यांनी रस्ता अडविणाऱ्या आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांना रस्ता अडविणाऱ्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला नाही. रस्ता अडविणारे व किरण कणगरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबीयांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता खुला करून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.