करियरच्या मागे धावणाऱ्या युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर -मीनाक्षी सहरावत
नगर (प्रतिनिधी)- करियरच्या मागे धावणारी युवा पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे परकीय शक्ती आपल्या संस्कृतीवर सतत आघात करत आहेत. परदेशी नागरिक आपली संस्कृती स्विकारत आहे. परदेशींनी स्वीकारल्यावर युवक त्याकडे आकर्षित होतात. याचे ज्वलंत उदाहरण सध्या सुरु असलेल्या कुंभमेळ्यात दिसत असल्याचे प्रतिपादन सनातन महासंघ व वैदिक मिशनरीच्या संस्थापिका मीनाक्षी सहरावत यांनी केले.
केडगाव येथील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहरावत बोलत होत्या. प्रारंभी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भारत भारती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कमलेश भंडारी, हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संस्थेचे सहकार्यवाह डॉ. रवींद्र चोभे, राजेश दिघे, आयुष कटारिया, काळे सर, डॉ. बलराज पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजीराजे पवार, बीएड कॉलेज प्राचार्य डॉ. अमरनाथ कुमावत, मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे सहरावत म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्या हक्का विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा, पण त्यासाठी जिजामाता होण्यास कोणीही तयार नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आजच्या काळातील मातांनी राजमाता जिजाऊ यांना आपले प्रेरणास्थान मानण्याचे त्यांनी आवाहन केले.
दादाराम ढवाण यांनी विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडून भारत देशाची सेवा करण्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी देशाच्या विकासात्मक वाटचालीवर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहाने शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळ्याला वेगळीच रंगत आली होती. भारत मातेचा जयघोष, देशभक्तीपर गीतांनी वातावरण प्रफुल्लीत झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करुन राष्ट्र ध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. आभार अनिता क्षीरसागर यांनी मानले.