विज्ञान परीक्षेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान
संविधान हा आपल्या लोकशाहीचा गौरव आहे -अंकुश शेळके पाटील
नगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा! असा संदेश दिला.
विद्यालयात संस्थेचे सचिव रावसाहेब पाटील शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करुन राष्ट्र ध्वजाला सलामी दिली. विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. विद्यार्थ्यांनी देशाची जडणघडण व विकासात्मक दिशेने वाटचालीवर भाषणे सादर केली. विविध देशभक्ती गीतांवर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
विद्यालयास क्रॉम्प्टन कंपनीकडून सौर ऊर्जा लॅम्प देण्यात आले. विज्ञान परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हास्तरीय विज्ञान परीक्षेत इयत्ता सहावी मधील प्रथम- समर्थ बाळासाहेब निमसे, द्वितीय- तन्वी संदीप दरंदले, इयत्ता नववी मधील प्रथम- सुजल कुलट राजाराम, द्वितीय- साक्षी जालिंदर भुजाडे यांनी क्रमांक पटकाविला. तसेच जिल्हा विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात कुलट सुजल राजाराम (इयत्ता नववी) या विद्यार्थ्यांस उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
शिवव्याख्याते दत्तात्रय कुलट यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम व त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रेरणादायी माहिती दिली. माजी सैनिक संपत निमसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष अंकुश रावसाहेब शेळके पाटील म्हणाले की, भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान अंमलात आल्यावर देशाची खरी विकासात्मक वाटचाल सुरू झाली. राज्यकारभार योग्य रितीने चालविण्यासाठी संविधानाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती भारताने जगाला दिली. संविधान हा आपल्या लोकशाहीचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जुने खारे ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.