प्रजासत्ताक दिन लोकशाहीचा गौरव -सुहासराव सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधान अमलात आल्यानंतर देशाची विकासात्मक वाटचाल सुरु झाली. राज्यकारभार चालविण्यासाठी संविधान महत्त्वाचा ठरला. प्रत्येकाचे हक्क, कर्तव्य, अधिकार, नियमावली व कायद्यांची सांगड यामध्ये घालून प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती भारताने जगाला दिली. प्रजासत्ताक दिनी लागू झालेले संविधान लोकशाहीचा गौरव असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा बँकेचे माजी अधिकारी सुहासराव सोनवणे यांनी केले.

बहुजन शिक्षण संस्थेचे भीमा गौतमी वस्तीगृहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसगी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, उपाध्यक्ष मंगेश शिंदे, अधिक्षिका रजनी जाधव आदी उपस्थित होते.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, मुली आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. राजकारण ते गृहिणी तर प्रत्येक क्षेत्रात महिलांनी ठसा उमटवला आहे. युवतींनी सक्षमीकरणाच्या उपक्रमात सहभाग घेऊन स्वत:ला सक्षम बनवावे. उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून आत्मविश्वासाने समाजात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रारंभी भिमा गौतमीच्या मुलींनी स्वागत गीत सादर करुन सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. वस्तीगृहातील मुलींना मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास ॲड. महेश शिंदे व पोपट बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.