• Sat. Apr 11th, 2026

साहित्य वाचनाने सृजनशील समाज घडतो – प्रा. राम शिंदे

ByMirror

Apr 7, 2026

संतोष कानडे यांच्या ‘पुस्तक भेट’ उपक्रमाचे विधान परिषदेचे सभापती शिंदे यांच्याकडून कौतुक

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “साहित्य वाचनामुळे समाज अधिक सृजनशील, विचारशील आणि प्रगल्भ बनतो,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. ते अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुस्तक भेट देत आपल्या विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे गेल्या काही वर्षांपासून ‘पुस्तक भेट’ हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी विविध शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पुस्तके भेट दिली आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृती वाढवणे हा आहे.

आजच्या डिजिटल युगात पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संतोष कानडे यांनी सांगितले की, वाढदिवस, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, संविधान दिन तसेच विविध राष्ट्रीय दिनांच्या निमित्ताने लोक सहसा इतर वस्तू भेट देतात. मात्र, त्याऐवजी पुस्तक भेट देण्याची सवय लावल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो.
“पुस्तक हेच खरे ज्ञानाचे दार उघडणारे साधन आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या क्षणी पुस्तक भेट देण्याची परंपरा रुजवावी,” असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी प्रा. राम शिंदे यांनी संतोष कानडे यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “अशा प्रकारचे उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती वाढून एक सुदृढ आणि सृजनशील समाज घडू शकतो.” आजच्या तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत वाचनाची सवय कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीत संतोष कानडे यांसारखे कार्यकर्ते समाजात वाचनाची जागृती निर्माण करत असून, त्यांचा हा प्रयत्न समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *