राज्य सचिव मंडळात अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांना संधी
नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन नुकतेच नाशिक येथे पार पडले. पुढील तीन वर्षांसाठी राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी आणि राज्य कौन्सिल सदस्यांची निवड करण्यात आली. राज्य सेक्रेटरी म्हणून अहिल्यानगरचे कॉ. ॲड. सुभाष लांडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर कॉ. राजू देसले (नाशिक) व कॉ. शाम काळे (नागपूर) याची सहसेक्रेटरी पदी निवड करण्यात आली.
सुमारे पन्नास वर्षांनंतर जिल्ह्याला कॉ. लांडे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा पक्षाच्या राज्य सेक्रेटरी पदाचा मान मिळाला असून, या पूर्वी माजी आमदार कॉ. एकनाथ भागवत दहा ते बारा वर्षे राज्य सेक्रेटरी होते. अकरा जणांच्या राज्य सचिव मंडळात अहिल्यानगर च्या कॉ. स्मिता पानसरे तर एकविस सदस्यांच्या राज्य कार्यकारिणी मध्ये कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पंचाहत्तर जणांच्या राज्य कौन्सिल मध्ये कॉ. ॲड सुधीर टोकेकर, कॉ. ज्ञानदेव सहाने, कॉ. भारती न्यालपेल्ली, निवृत्ती दातीर, संदीप इथापे यांचा सहभाग आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव कॉ. अमरजीत कौर, डॉ. भालचंद्र कांगो, कॉ. पद्मा पश्या यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवस चाललेल्या अधिवेशनात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिस्थिती तसेच देशातील व राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. राज्यातील पक्ष संघटना बांधणी करण्यासाठी उपाययोजना व नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा, 9 जुलै रोजी होणाऱ्या कामगार शेतकरी संपाला पाठिंबा, वाढती महागाई, पहिली पासून हिंदी भाषा लादण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा या सह 37 ठराव मंजूर करण्यात आले.