शहरातील मुख्याध्यापकांसह शालेय शिक्षकांचा एकत्रपणे रंगला सन्मान सोहळा
राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. शिक्षकांच्या योगदानाने देशाचा विकास साधला गेला आहे. चांद्रयानची मोहिम यशस्वी करुन व सुर्यावर स्वारी करणाऱ्या शास्त्रज्ञांना देखील शिक्षकांनीच घडविले आहे. सर्व क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा पाया शिक्षकांनीच रोवलेला असतो, राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयुर्वेद महाविद्यालय येथे शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापकांसह सर्व शालेय शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, राष्ट्रवादी विधी सेलच्या ॲड. अंजली आव्हाड, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, सुमित कुलकर्णी, निलेश बांगरे, प्रशांत नन्नवरे, अमोल कदम, विलास साठे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, अमोल क्षीरसागर, समीर पठाण, नामदेव पतंगे, दत्तात्रय झगडे, अविनाश साठे, दत्तात्रय पानमळकर, महेश भगत, सुरज घाटविसावे आदी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, सध्या शिक्षण प्रणाली बदलत चाललेली आहे. यामध्ये अमुलाग्र बदल होत आहे. खासगी शिक्षण व्यवस्थेने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर शिक्षणाचा खर्च जात आहे .मोठ-मोठे व्यक्ती पूर्वी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेत शिकून मोठे झाले. मात्र सध्या या शाळांची बिकट अवस्था निर्माण झाली असून, याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षक समाज घडवीत असतो, त्यांच्या कार्याची किंमत करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, यशस्वी राष्ट्राचा पाया शिक्षकांच्या कार्यावर अवलंबून असतो. राष्ट्राची पायाभरणी शिक्षकांच्या माध्यमातून होत असते. समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी प्रास्ताविकात शिक्षकांचे प्रश्न मांडले. तर शिक्षकांवर लादण्यात आलेले अशैक्षणिक कामे थांबविण्यासाठी एकत्र येऊन लोकप्रतिनिधी समोर विषय मांडण्याचे त्यांनी स्पष्ट करुन, शहरात शिक्षक मदत कक्ष उभारण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शहरातील तब्बल 40 प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांना शालेय शिक्षकांसह आमदार जगताप यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तर 14 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भगत यांनी केले. आभार अभिजीत खोसे यांनी मानले.
