दिंडीत अवतरले नागा साधू, शंकर-पार्वती
भगवान शंकराचा जयघोष, टाळ-मृदूंगचा निनाद आणि भक्तीमय वातावरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
नगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री निमित्ताने केडगाव मध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.27 फेब्रुवारी) हर हर महादेवचा गजर करुन दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. या मिरवणुकीत अबालवृध्दांसह भाविक व महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, भगवान शिवाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक घोषणांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात दिंडी प्रदक्षिणा रंगली होती.

नागा साधू, शंकर-पार्वतीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या दिंडीचे केडगाव पंचक्रोशीतील भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. दिंडी मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळी रेखाटून, सडा टाकला होता. दिंडीतील भगवान शिवाच्या रथावर फुले उधळण्यात आली.

भगवान शंकराच्या जयघोषाने परिसर निनादला. मुली व मुलांनी वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. हातात टाळ घेऊन विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठलाचा घोष केला. दिंडी पाहण्यासाठी केडगाव ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तर मुलींसह महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता.
केडगावच्या उदयनराजे नगर येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी शिवलिलामृत पारायण आणि तपपुर्ती सोहळा सुरु आहे. या निमित्ताने दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. या दिंडीत शकुंतला पवार, शितल सातपुते, दीपा भांबरे, शितल आजबे, शुभांगी घोडके, वैष्णवी भुक्कन, मेघा सातपुते, प्रमिला गीते, उर्मिला ढाकणे, शितल खेडकर, धांडे मावशी, विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, सचिन बडे, सागर सातपुते, महेश वाळके, भूषण गुंड, योगेश कुमठेकर, नितीन आजबे, महेश घोडके, आंधळे मेजर, पवार सर, मच्छिंद्र भांबरे, जगन्नाथ आंधळे, गोरक्षनाथ कोकाटे, कुंडलिक कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, कैलास भुक्कन, विशाल सकट, शिवा मोडवे, अमित रासकर, कैलास नागरगोजे, दीपक बडे, मयूर भोसले, गोरख कोतकर आदींसह मराठा नगर, वैष्णव नगर, शिवाजी नगर, भूषण नगर, एकनाथ नगर, उदयनराजे नगर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर भगवान शंकराची आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.