केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शारीरिक व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मुलांना खेळाची आवश्यकता -उमेश परदेशी
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धा रंगली होती. केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 14 व 17 वर्षाखालील असे मुलांच्या दोन गटात ही स्पर्धा पार पडली. यामध्ये शहर व उपनगरातील बास्केटबॉलचे 12 संघ सहभागी झाले होते. दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी तर 17 वर्षाखालील गटात बॉलर्स सारडा महाविद्यालय संघ विजयी ठरला.
मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. सचिन आहेर, डॉ. देवेश कुमार बारहते, राष्ट्रीय खेळाडू विलास (तात्या) कोतकर उपस्थित होते.
मनोज कोतकर म्हणाले की, मैदानी स्पर्धेमुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या काळात मुले शारीरिक दृष्ट्या सक्षम होतील. स्पर्धेतून मुलांमध्ये खेळाची आवडत निर्माण होणार आहे. खेळामुळे सरकारी नोकरीतही प्राधान्य असून, मुलांप्रमाणे मुलींनी देखील मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले.
या स्पर्धेत एसबीसी सावेडी, एबीसी वाडिया पार्क, बॉलर्स सारडा महाविद्यालय, कारमेल इंग्लिश मिडीयम स्कूल केडगाव, आर्मी बॉईज, समर्थ विद्या मंदिर सांगळे गल्ली, केडगाव स्पोर्ट्स आदी संघांचा समावेश होता. अत्यंत चुरशीचे सामने यावेळी रंगले होते. यामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून आयुष राऊत व आदित्य चव्हाण या मुलांची निवड करण्यात आली.
विजेते संघ व उत्कृष्ट खेळाडूंना पोलीस दलातील राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. परदेशी यांनी मुलांना शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व देण्याचे सांगितले. अभ्यास व खेळ याची सांगड घालून वाटचाल केल्यास शैक्षणिक जीवनाचा आनंद लुटता येणार असल्याचे सांगितले. केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व पदाधिकारी व प्रशिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे छबुराव कोतकर, प्रा. प्रसाद जमदाडे, प्रशिक्षक सत्यम देवळालीकर, शाहनवाज शेख, ओमसिंग बायस, राष्ट्रीय खेळाडू सचिन अग्रवाल, प्रा.लोंढे, पंच म्हणून व्हिक्टर, नशरा, यश म्हस्के, हर्षल सेलोत, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, खजिनदार रोहिणी कोतकर, किरण नाट आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी व्यंकटेश कन्स्ट्रक्शनचे प्रसाद आंधळे व ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचे प्रसाद जमदाडे यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन संदीप कोतकर मित्र मंडळ व स्वाती बारहाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद जमदाडे यांनी केले. आभार रोहिणी कोतकर यांनी मानले.
