विद्यार्थ्यांनी रेखाटले भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहभाव
नगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शहरात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या चॉकलेट कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी आणि भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहभाव व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी निशुल्क होती. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तीन गटांमध्ये ती पार पडली. लहान (इयत्ता पहिली ते चौथी), मोठा (इयत्ता पाचवी ते सातवी) व वरिष्ठ (इयत्ता आठवी ते दहावी) या तीन गटात ही स्पर्धा पार पडली. लहान गटासाठी रंग भरणे आणि इतर गटांसाठी रक्षाबंधन हा विषय देण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणाच्या भावनांना उजाळा देत विविध रंगसंगतीतून सुंदर कलाकृती साकारल्या. ड्रीमि चोको डिलिशियसच्या संचालिका सुप्रिया महेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संचालक प्रविण साळवे, सारिका शेलार, स्वातंत्र्य सैनिक जानकी कवडे प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र आर. कवडे, संचालिका राज रवींद्र कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे मुलांना आपली संस्कृती समजते आणि कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगितले. प्रविण साळवे यांनीही स्पर्धेतून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळून त्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व व नात्यातील गोडवा या स्पर्धेतून जाणवला असल्याचे सांगितले.
या स्पर्धेत जिनत शाबीर बेग, साफिया सलीम शेख, शबनम आसिफ पठाण, असद आरिफ पठाण, दानिश जावेद पठाण, वजिहा नईम तांबोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बक्षिसे पटकाविली. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि चॉकलेट गिफ्ट हॅम्पर देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर यांनी स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपली संस्कृती जाणून घेण्याची आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी शालेय शिक्षिका उज्ज्वला घावटे, सुनंदा जावळे, स्वयंप्रभा खंडागळे, मुबीना काझी, तब्बसूम शेख, सिराज खान, दिपक पंडित, गणेश कवटे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज खान यांनी केले. तर आभार दीपक पंडित यांनी मानले.
