भक्तीगीतांवर भाविकांनी धरला ठेका
महिलांचा रंगला रास गरबा नृत्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त माता की चौकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. जय दुर्गे जागरण मंडळाने माता की चौकी कार्यक्रम सादर केला. यावेळी शीख, पंजाबी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रात्री रंगलेल्या माता की चौकी कार्यक्रमात विकी साहनी, सनी गुलाटी व त्यांच्या सहकलाकारांनी देवीचे भक्तीगीते सादर केली. देवीच्या एकाहून एक सरस भक्तीगीतांनी वातावरण प्रसन्न बनले होते. भक्त चलो, दरबार चलो…., दुखीयो के कष्ट निवारी, आज हे जगराता…, मेरी माँ, मेरी माँ…. आदी गीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. वाद्यांसह भक्तीगीतांवर बहरलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला.

तर शेवटच्या टप्प्यात महिलांनी रास गरबा नृत्य केले. तर भाविकांनी भक्तीगीतांवर ठेका धरला होता. भक्तीमय वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला होता. हात उंचावून भाविकांनी देवी मातेचा जयजयकार केला. देवीच्या रुपात प्रकट झालेल्या अनया विवेक गुप्ता या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे यजमान प्रीतपालसिंह धुप्पड परिवाराच्या वतीने देवीची आरती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. भंडाऱ्याने कार्यक्रमाची सांगता झाली. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व गाभाऱ्याभोवती फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

