मराठी पत्रकार परिषदेचा सामाजिक उपक्रम
शेवटच्या घटकांसाठी झटणाऱ्या हाताला बळ देण्याचे परिषदेचे कार्य कौतुकास्पद -सहा.पो.नि. कल्पना चव्हाण
नगर (प्रतिनिधी)- बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संचलित उडान प्रकल्प आणि शहराच्या झोपडपट्टी भागात शिक्षणातून पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या बालभवन मध्ये कार्यरत महिला स्वयंसेविकांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटसह पावसाळी किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तोफखाना पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पत्रकारांच्या नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख,उडानचे व्यवस्थापक प्रवीण कदम, बालकल्याण समिती सदस्य ॲड. अनुराधा येवले, बालभवन प्रकल्पाच्या व्यवस्थापिका उषा खोलम, मुक्ती वाहिनीचे समन्वयक शाहीद शेख, नवेद शेख आदींसह उडान व बालभवनच्या महिला स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण म्हणाल्या की, समाजातील शेवटच्या घटकांसाठी झटणाऱ्या हाताला सातत्याने बळ देण्याचे कार्य शहरात मराठी पत्रकार परिषद करत आहे. समाजातील प्रश्न मांडत असताना सामाजिक संवेदना जागरुक ठेवून त्यांना मदतीचा हात पुढे करण्याचे पत्रकारांचे कार्य अभिमानास्पद आहे. फक्त प्रश्न मांडून न थांबता ते तडीस नेण्याचे कार्य केले जात आहे. यापूर्वी देखील त्यांच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होवून मिळालेला सन्मान देखील आठवणीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजयसिंह होलम यांनी सर्वच प्रश्न शासकीय यंत्रणेद्वारे सुटू शकणार नाही. यासाठी समाजात उतरुन या प्रश्नासाठी लढाई करावी लागणार आहे. स्नेहालय संचलित उडान व बालभवनच्या माध्यमातून शेवटच्या घटकांसाठी संघर्ष सुरु असून, या लढ्याला हातभार लावण्याचे काम दरवर्षी मराठी पत्रकार परिषद करत आहे. त्यांची खरी गरज ओळखून त्यांना मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेपासून ते बाल दिनाचे उपक्रम राबविण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली. ॲड. अनुराधा येवले यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
उडान प्रकल्पातील स्वयंसेवक पावसाळ्यातही बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत राहून मोटारसायकवर विविध ठिकाणी जात असतात. त्याचप्रमाणे झोपडपट्टी भागात मुलांना बालभवनच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य स्वयंसेविका करत आहे. त्यांच्या या कार्यात पावसाने खंड पडू नये, यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांच्यासाठी रेनकोट व पावसाळी किटची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मन्सूर शेख यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कदम यांनी केले. आभार उषा खोलम यांनी मानले.