पाणीटंचाईवर उपाय आणि हवामान बदलावर मात करण्यासाठीची चळवळ; पीपल्स हेल्पलाईन व निर्मल पिंपरीच्या ग्रामस्थांचा पुढाकार
रेन गेन बॅटरी म्हणजे आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील निर्मल पिंपरी येथील ज्येष्ठ महिला शेतकरी शांताबाई देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावात रेन गेन बॅटरी या आधुनिक पद्धतीने पाणी साठवण्याच्या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे.
शांताबाई देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी एक अभिनव आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. शांताबाई देसाई यांनी आपले संपूर्ण जीवन शेतीसाठी समर्पित केले होते. वारंवार येणाऱ्या दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करत त्यांनी आपल्या जमिनीशी अतूट नातं टिकवून ठेवलं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या फार्महाऊसवरच 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीच्या सन्मानार्थ गावात रेन गेन बॅटरी या आधुनिक पद्धतीने पाणी साठवण्याच्या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट गावपातळीवर पाणीटंचाईवर मात करणे, जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी शाश्वत पर्याय निर्माण करणे आणि पर्यावरणीय समतोल राखणे हे असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ॲड. कारभारी गवळी यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, रेन गेन बॅटरी ही एक क्रांतिकारी तंत्र आहे जी पावसाचे पाणी जमिनीत साठवण्यासाठी, मातीतील ओलावा कायम राखण्यासाठी आणि शेतजमिनीला वर्षभर उपयुक्त ठरणारी आहे. यामुळे शेती अधिक शाश्वत होईल, जैवविविधतेला चालना मिळेल आणि पिकांचे उत्पादनही टिकून राहील.ही केवळ श्रद्धांजली नव्हे, तर आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे, असे सांगत ॲड. गवळी पुढे म्हणाले की, हवामान बदल आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समुदायाने घेतलेले हे पाऊल आत्मनिर्भरतेचा आणि पर्यावरणीय जबाबदारीचा उत्तम नमुना आहे. सामूहिक प्रयत्नांतून शाश्वत आणि प्रभावी उपाय शक्य होतात, याचा हा आदर्श दाखला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शांताबाई देसाई यांचा वारसा हा केवळ त्यांच्या कुटुंबापुरता सीमित नसून, संपूर्ण गाव आणि देशासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. रेन गेन बॅटरीसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केवळ पाण्याचा योग्य वापर होणार नाही, तर पर्यावरण संरक्षणातही मोठा वाटा उचलता येईल. या उपक्रमाद्वारे निर्मल पिंपरीचे ग्रामस्थ इतर गावांसाठी एक नवा दिशादर्शक आदर्श ठरू शकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.