राधा-कृष्ण रासलीलेच्या जीवंत देखाव्याने भाविक मंत्रमग्ध
भक्तीगीतांमध्ये भाविक रममाण; चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिरात (ट्रस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. बुधवारी (दि.6 सप्टेंबर) मध्यरात्री 12 वाजता मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर गुरुवारी मंदिरात गोपाळकाला उत्साहात पार पडला.

बुधवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात बबलू दुग्गल व त्यांच्या सहकलाकारांनी राधा-कृष्णवर एकाहून एक सरस भक्तीगीते सादर केली. भक्तीगीतांनी बहरलेल्या कार्यक्रमाचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी शीख, पंजाबी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राधा-कृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले व विविध भक्तीगीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. गोविंद बोलो, हरि गोपाळ बोलो… भजन सादर करुन रात्री 12 वाजता मंदिरातील पाळणा हलविण्यात आला. सजवलेल्या पाळण्यात भगवान श्रीकृष्णची प्रतिमा ठेवण्यात आली होती.

गुरुवारी सकाळी मंदिरात कृष्ण लीलाचे सादरीकरण करण्यात आले. कृष्ण व सुदामा भेट व राधा-कृष्ण रासलीलेचा जीवंत देखाव्याने भाविक मंत्रमग्ध झाले. हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की! जयघोष करुन चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. पावसाच्या संतधारेत झालेल्या कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहचला होता. श्री कृष्णाच्या वेभुषेत आलेले लहान चिमुकले कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धार्मिक सोहळ्यासाठी ट्रस्टचे सर्व विश्वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
