• Wed. Jan 21st, 2026

गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेत रंगले उपांत्यपूर्व फेरीचे सामने

ByMirror

Nov 29, 2025

बाटा एफसी व इलाइट एफसी उपांत्य फेरीत


अटीतटीचे सामने, टायब्रेकरवर निर्णय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे दिवंगत माजी सचिव गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने तुल्यबळ संघांमुळे अत्यंत रोमांचक ठरले. यामध्ये बाटा एफसी आणि इलाइट एफसी या दोन संघांनी प्रभावी खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
ही स्पर्धा भुईकोट किल्ला येथील मैदानावर सुरू असून, फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीच्या वतीने, जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि डिक परिवाराच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, नगर जिल्ह्यातील फुटबॉलप्रेमीं सामने पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच्या सामन्यात नमोह फुटबॉल क्लब विरुद्ध फिरोदिया शिवाजीयन्स (A) असा सामना खेळविण्यात आला. हा सामना अतिशय चुरशीचा ठरला आणि निर्धारित वेळेत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. परिणामी सामना टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये 5-4 गोलने नमोह फुटबॉल क्लबने विजय मिळवून पुढील फेरीत मजल मारली.
शुक्रवारी (दि. 28 नोव्हेंबर) खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रेंडस एफसी विरुद्ध बाटा एफसी असा मुकाबला रंगला. बाटा एफसीने 2-1 ने विजय मिळवला. गणेश सुडकेने दोन्ही गोल करून संघाचा विजय निश्‍चित केला. फ्रेंडस एफसीतर्फे जय आढाव याने 1 गोल करत संघाची प्रतिष्ठा राखली.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात इलाइट एफसी विरुद्ध गुलमोहर एफसी असा सामना खेळविण्यात आला. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी अत्यंत शिस्तबद्ध बचाव आणि जबरदस्त आक्रमण केले असले तरी पूर्वनिर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही. त्यामुळे सामना टायब्रेकरवर गेला आणि इलाइट एफसीने कौशल्यपूर्ण पद्धतीने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

नमोह फुटबॉल क्लब विरुद्ध फिरोदिया शिवाजीयन्स (A) संघातील सामना.

उपांत्यपूर्व फेरीतील फ्रेंडस एफसी विरुद्ध बाटा एफसी यांच्यात रंगलेला सामना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *