उद्योग मंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून खामकर यांचे कौतुक
झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड युवकांना प्रेरणा व दिशा देणारे पुस्तक -उदय सामंत (उद्योग मंत्री)
नगर (प्रतिनिधी)- शहरातील युवा लेखक तथा सिव्हिल इंजि. स्वप्निल संजय खामकर लिखित झिरो टू लॉन्च आणि द सीईओ ऑफ द माईंड या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन कवि श्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव असलेले शिरवाडे वणी (ता. निफाड, जि. नाशिक) येथे राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी (निफाड) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कवितेचे गाव शिरवाडे वणी चे कवि श्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गावाला राज्यातील दुसरे कवितेचे गाव बनविण्याचे महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाला रूप येत आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने येथील कवितेच्या एका दालनाचे औपचारिक उद्घाटनाप्रसंगी खामकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमात युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
युवकांना विकासाची दिशा देण्यासाठी खामकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे उद्योग मंत्री सामंत व शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी कौतुक केले. उद्योग मंत्री सामंत यांनी जगातील युवक विकासात तसेच उद्योगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. पुस्तकाच्या माध्यमातून एक मराठी युवक जगात मार्गदर्शन करीत आहे, याचा तमाम मराठी माणसांना अभिमान आहे. या पुस्तकांची मराठी आवृत्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आपणास सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार असून, आपल्या मराठी युवकांना या पुस्तकाच्या माध्यमातून विकासाची व उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
स्वप्नील खामकर या मराठी युवा साहित्यकाचा सन्मान कविश्रेष्ठ कुसुमाग्रहांच्या भूमित केल्याने विशेष आनंद होत आहे. तो 2017 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना वास्को-द-गामा वर आधारित 8 द गेम इज ऑन हा पुस्तक लिहिणारा महाराष्ट्रातील अत्यंत कमी वयाचा दुसरा युवक ठरला होता. त्याने ट्रॅडिशनल पब्लिशर ओथरचा मान मिळवला असून, त्याचे लिखाण युवकांना स्फुर्ती देणारे ठरणार असल्याचेही उद्योग मंत्री सामंत म्हणाले.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सुद्धा मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने स्वप्निल खामकर या युवा मराठी साहित्यिकाचा पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सन्मान होत असल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपरावजी बनकर, शिवसेना नेते भाऊ चौधरी, श्रीमती पियू शिरवाडकर, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक माननीय शामकांत देवरे आदींसह शासनाचे पदाधिकारी, साहित्यिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वप्निल खामकर यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुस्तक प्रकाशनासाठी संतोष कानडे, दिनेश देवरे, संदीप सोनवणे, रुपेश लोखंडे यांनी परिश्रम घेतले. संजय खामकर यांनी आभार मानले.