जीवनात आनंद व सकारात्मकतेने जगण्याची दिशा काव्य आणि साहित्य देतात -डॉ. संजय कळमकर
पोपटराव गवळी लिखित समाजातील विविध घटक व पैलूंचा वेध घेणारा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह
नगर (प्रतिनिधी)- वाचन कमी झालेले नसून, वाचनाचे माध्यम बदलले आहे. सोशल मीडियातही मोबाईलद्वारे वाचनाचा छंद जोपासला जात आहे. लेखकांनी लिहित रहावे व विविध माध्यमातून व्यक्त होत रहावे. जीवनात आनंद व सकारात्मकतेने जगण्याची दिशा काव्य आणि साहित्य देत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी केले.
समाजाच्या विविध घटक व पैलूंचा वेध घेणारे हृदयस्पर्शी गणराज प्रकाशन प्रकाशित आणि पोपटराव गवळी लिखित ओंजळीतलं सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी डॉ .कळमकर बोलत होते. म.सा.प.चे (पुणे) केंद्रीय सदस्य चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री तथा साहित्यिका प्रतिभा खैरनार, सामाजिक कार्यकर्ते तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे, गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत, लेखक पोपटराव गवळी, इंजि. राजहंस देसाई, इंजि. गणेश गवळी, डॉ. अबोली निकम, इंजि. गौरी शिंदे आदींसह साहित्यिक, कवी व गवळी कुटुंबीय उपस्थित होते.
पुढे डॉ. कळमकर म्हणाले की, आयुष्यात एक तरी छंद जोपासावा, जो उतार वयात आनंद देतो. व्यक्त होणे महत्त्वाचे असून, साहित्य आणि कवितांमधून स्वत:ला व्यक्त होता येते. सुख-समाधान यांची सांगड आवश्यक असून, जुन्या लोकांकडे समाधान होते. मात्र सध्याच्या पिढीकडे सुख असून, समाधान नाही. इतिहास व भविष्याची सांगड घालून वर्तमानात चांगले जगले तर जीवनाचा आनंद घेता येतो, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्रकाशक प्रा .गणेश भगत यांनी गणराज प्रकाशनचे हे 196 वे पुस्तक प्रकाशन आहे. नवोदित कवी आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. अनेक नवोदित कवींना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पोपटराव गवळी यांनी ओंजळीतलं सुख या काव्य संग्रहात आयुष्यातील अनुभव शब्दबद्ध करुन ते काव्यात उतरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिभा खैरनार म्हणाल्या की, अनुभवातून कविता समृद्ध होते. ज्येष्ठ कवीच्या काव्य संग्रहास प्रस्तावना देताना अभिमानास्पद वाटत आहे. या काव्यसंग्रातील सर्व कविता वास्तव जगाचा वेध घेणारे आहेत, जगण्यातून चिंतन, परिस्थितीचे दर्शन घडवून सकारात्मक संदेश काव्यातून मिळत आहे. माणुसकीचे दान कवी मागतो. वेदना, संवेदना काव्यातून वास्तव चित्रण उभे राहिले असल्याचे त्या म्हणाल्या.
चंद्रकांत पालवे यांनी शब्दावर प्रेम करणारी माणसे आनंदी जीवन जगतात. ते त्यांच्या भावविश्वात रमलेली असतात. उतार वयात खरे आयुष्य जगण्याची संधी मिळते. मात्र त्याकडे सकारात्मक नजरेने पहाता आले पाहिजे. कविता फक्त शब्दात नसते, ती जगण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
राजहंस देसाई म्हणाले की, जीवनातील अनुभव शब्दात उमटून काव्य तयार होते. अंत:करणाशी संवाद साधणारा हा काव्य संग्रह आहे. कविता अनुभवून कवी जगले असून, वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या कविता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लेखक डी.एस. पाटील यांनी लेखक गवळी यांनी काव्य संग्रहाच्या प्रकाशनाला शुभेच्छा दिल्या. जालिंदर बोरुडे म्हणाले की, पोपटराव गवळी यांनी शासकीय सेवेत उत्तमपणे कार्य केले. सेवेत कार्यरत असताना त्यांचे काव्य फुलत गेले व त्यांनी ते शब्दबद्ध करुन जीवनातील सुखाची व्याख्या वाचकांपुढे ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना कवीवर्य पोपटराव गवळी म्हणाले की, पुस्तक रूपाने व्यक्त झालो. लहानपणापासूनच कल्पना कागदावर उतरविल्या त्यातून काव्य फुलत गेले. ज्येष्ठ कवींचा सहवास लाभला. शालेय स्नेहसंमेलनात दिग्गज कवी समोर कविता सादरीकरणाची मिळालेली संधी व लिहिता लिहिता काव्य संग्रहा पर्यंतचा प्रवास त्यांनी विशद केला. तर हृदयाला भिडणारे काव्याचे वाचन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ओंजळीतले सुख पुस्तकाचे प्रकाशन करून कवि पोपटराव गवळी यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती अहिरे यांनी केले. आभार इंजि. गणेश गवळी यांनी मानले.
