प्रतिभा व पंखात बळ निर्माण करण्याचे काम कविता करतात -उत्तम कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कवी त्याने तयार केलेल्या शब्द, प्रतिभा व कल्पनेच्या जगात वावरत असतो. कविता कोणाची गुलाम नाही. माणसाला व्यक्त होण्याची गरज, उर्मी भासते, तेव्हा माणूस स्वतःला चित्र, काव्य व साहित्यातून व्यक्त होत असतो. ज्याला वेडा होता येत नाही, त्याला कवी होता येत नाही. जग सुसंस्कृत करण्यासह प्रतिभा व पंखात बळ निर्माण करण्याचे काम कविता करतात. मातृवृक्ष कवितासंग्रहातील शंभर कविता नवदृष्टी व दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. तर व्यवस्था शस्त्राला घाबरत नाही, मात्र व्यवस्था बदलण्याची शक्ती असलेल्या साहित्यिक, कलावंत विचारवंतांना घाबरत असल्याचे स्पष्ट केले.
कवयित्री तथा माजी प्राचार्या हेमलता प्रदीप गीते यांच्या मातृवृक्ष कवितासंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात कांबळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हनुमंत माने, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा व प्रकाशक डॉ. स्नेहल तावरे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, ग्राहक मंचचे सदस्य शब्बीर बिलाल अहमद शेख, कवयित्री हेमलता गीते, प्रदीप गीते, क्रीडा शिक्षक उन्मेश शिंदे, नितीन गीते, निता गीते, अंकित गीते उपस्थित होते.

पुढे कांबळे म्हणाले की, वृक्ष भेदाभेद न करता, सर्वांना समान आश्रय देऊन फुळ, फुल व सावळी देत असतो. या माध्यमातून मातृवृक्ष आघाडीवर आहे. कवयित्रीने सुंदर कल्पना आपल्या काव्यसंग्रहातून उलगडून आईचे वात्सल्य व्यक्त केले आहे. पृथ्वी शेषनागावर तरलेली नसून, वंशवृक्षावर तरलेली आहे. ज्या क्षणी वंशवृक्षाचा विद्रोह होईल त्यावेळी समाज कोलमडेल. सामान्य माणसापेक्षा कवी वर्ग वेगळा असतो. जेथे व्यवस्था थांबते तिथे कवीचे काम सुरू होते. प्रतिभा व वेदनांचा जेथे संगम होतो, तेथे कविता जन्माला येते. संवेदनांचा काटा काळजात आरपार झाल्याशिवाय कविता बाहेर येत नाही. जगातील सर्वांच्या दुःखाची नाळ कवींशी जोडलेली असते. जगातील दुःखाचे ओझे वाहताना तो न्यायाचा तराजू घेऊन फिरतो, असे सांगून त्यांनी कवींचे भावविश्व उलगडले.
कवयित्री हेमलता गीते म्हणाल्या की, मातृवृक्ष म्हणजे पुरातन बीजधारी वृक्ष होय. संपूर्ण विश्व निर्माण करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. तो वृक्ष सर्वांना समान सावली, फळ-फुले देतो. मनापासून सर्व काही देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक आई जिवंत मातृवृक्ष आहे. आई समजून घेणे सोपे नसून, प्रत्येकाची आई सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. आईच्या वात्सल्याचे भावविश्व उलगडताना त्यांचे डोळे पानावळे तर संपूर्ण सभागृह भाऊक झाले. यावेळी त्यांनी प्रकाशाच्या शोधात आज अंधार मी तुडवीत आहे! सिद्ध करण्यास स्वतःला स्वतःलाच समर्पित करत आहे…. ही कविता सादर केली.
हनुमंत माने यांनी शंभर कवितासंग्रहाचा सहभाग असलेल्या या काव्यसंग्रहामध्ये उत्तम कवितांचा समावेश आहे. हे अफलातून साहित्य उत्तम कल्पना व निरीक्षणातून निर्माण झाले आहे. नातू सुनापासून ते गुरुवर्यपर्यंत कवितेचा समावेश असल्याचे सांगितले. डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या की, कविता करणे सोपे नाही. त ला त आणि र ला र जोडले म्हणजे कविता होत नाही. कविता जीवनाची अनुभूती दर्शवित असतात. मातृवृक्ष काव्यसंग्रहातून आत्मकाव्य निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात ॲड. मनिष गीते यांनी कविता जगण्याची प्रेरणा देतात. सुख, दुःखात सर्व परिस्थितीवर मात करण्याचे बळ देतात. लेखिकेने आईच्या वात्सल्याच्या शिदोरीची कविता यामध्ये अंतर्भूत असल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत रविंद्र गीते यांनी केले. वृषाली तूपसाखरे यांनी देखील भावना व्यक्त करुन कवयित्री गीते यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अरविंद गीते यांनी शंकर महाराजांची मुर्ती कवयित्री गीते यांना भेट देऊन सन्मान केला. 1982 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिका तथा कवयित्री गीते यांचा सत्कार केला. पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन निवृत्त प्राचार्य श्याम जोशी यांनी केले. आभार ॲड. गीतांजली गीते यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
