दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टची मागणी; निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेल्या शहरातील मोहरमच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी चेअरमन सय्यद दस्तगीर बडेसाब, खजिनदार जुबेर सय्यद, विश्वस्त शकूर शेख, ॲड. नजीर खान, सय्यद निसार बडेसाब, ॲड.फारुक शेख, खालिद सय्यद आदी उपस्थित होते.
शहरातील मोहरम उत्सवात सर्व धर्मिय समाज बांधव सहभागी होत असतात. मोहरम 27 जून पासून प्रारंभ होत आहे. दरवर्षी प्रमाणे जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून भाविकांच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे.
पाच दिवसासाठी जनरेटरची व्यवस्था बारा इमाम कोठला येथे करुन द्यावी, सवारी मार्गावर डांबरीकरण व रोडची पॅचिंग करून द्यावी, सवारी मार्गावर लाईटची व्यवस्था करावी, मोहरमची नऊवी तारीख म्हणजे 5 जुलै रोजी कत्तलच्या रात्री सवारीच्या पाठीमागे विद्युत रोषणाईसाठी जनरेटरची व्यवस्था करावी, बारा इमाम कोठला मधील दर्गाजवळची विहीरची स्वच्छता करावी, कोठला परिसरातील जागेची सफाई करुन दर्गाच्या आत पाच दिवसासाठी वेगळे जनरेटर उपलब्ध करून द्यावे. तसेच मोहरमच्या पाच दिवसात प्रत्येक चौकात विविध धार्मिक कार्यक्रम, सरबत व भंडाराचे आयोजन केले जात असून, शहरात पाणी, स्वच्छता, फिरते शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल नुकताच लागला आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये मुस्लिम वक्फ बोर्डने सदर ट्रस्टला उत्सव साजरा करण्याची अधिकृत परवानगी दिलेली आहे. ट्रस्टच्या परवानगीशिवाय कोणीही कोठला परिसरात अनाधिकृतपणे स्टॉल लावू नये व पावत्या देखील फाडू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. -सय्यद दस्तगीर बडेसाब (चेअरमन, दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्ट)