पारनेर शाखेची जागा खरेदी सर्व सभासदांना विश्वासात घेवून करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सत्ताधारी संचालक मंडळाने पारनेर शाखेची जागा सभासदांना विश्वासात न घेता खरेदी करण्याची कार्यवाही चालविल्याच्या निषेधार्थ विरोधी संचालक व सभासदांनी पारनेर शाखे समोर निदर्शने केली. तर पारनेर तालुक्यातील सर्व सभासदांचा मेळावा घेऊन त्यांच्या समोर जागेचा प्रश्न मांडावा व त्या नंतरच सोयीची जागा खरेदी करण्याचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात सोसायटीचे संचालक विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे, सभासद बाळासाहेब निवडुंगे, बापूसाहेब होळकर, अमोल ठाणगे, राहुल झावरे, जयवंतराव पुजारी, भगवान राऊत, विजय पठारे आदी सहभागी झाले होते. सत्ताधारी संचालकांनी मनमानी कारभार करुन परस्पर जागा खरेदी केल्यास सर्व तालुक्यातील सभासद एकत्र करुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पारनेर शाखेच्या जागा खरेदीसाठी एकदा निविदा काढून संचालकांच्या बैठकीत निविदा उघडण्यात आल्या. त्याच बैठकीत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामधील निविदा एकाच व्यक्तीच्या होत्या. सध्या ज्या जागेवर शाखा कामकाज पाहते त्याच ठिकाणची जागा घेण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळाचा अट्टाहास होता. परंतु संबंधित जागेबाबत सद्यस्थिती पाहिली असता अतिशय गैरसोयीची जागा आहे. फरश्या फुटलेल्या असून, पाण्याची सोय नाही व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे विरोधी संचालकांनी म्हंटले आहे.
केवळ आर्थिक हितापोटी सत्ताधारी संचालकांनी ती जागा खरेदीचा घाट घातला आहे. या गैरकारभारा विरोधात सर्व सभासदांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाणार आहे. ज्या जागेवर संस्थेचे कामकाज सुरु आहे, त्या जागेस 9 हजार रुपये भाडे व 2 लाख रुपये अनामत रक्कम सोसायटीने दिलेली आहे. मात्र त्याच इमारतीमध्ये इतर सदनिका धारकांना भाड्यांदर्भात विचारले असता फक्त 4 हजार 500 रुपये पर्यंत भाडे असून, आपल्या संस्थेने मात्र दोन लाख रुपये डिपॉझिट दिलेले आहे. सभासदांच्या पैश्याची एक प्रकारे उधळपट्टी सुरु असून, सभासदांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची गरज असल्याचे आप्पासाहेब शिंदे यांनी म्हंटले आहे.
