आर्थिक हित साधण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला का? याची देखील चौकशी व्हावी -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत धुडगूस घालून ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाची तोडफोड प्रकरणाचा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. कार्यालयावर झालेला हल्ला हा एकप्रकारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला असून, दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी कास्ट्राईबच्या वतीने करण्यात आली आहे.
गुरुवारी (दि.18 जानेवारी) एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर हल्ला करुन दहशत निर्माण केली. यामध्ये सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले. सदरची बाब अत्यंत गंभीर असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. हल्लेखोराच्या मागणीनुसार जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी झालेली आहे. पाईपलाईनचे काम व्यवस्थित असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायत, सरपंच यांनी अहवाल देखील दिला आहे. मात्र आर्थिक हित साधण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला का? याची देखील चौकशी होणे गरजेचे असल्याचे कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांनी म्हंटले आहे.
या घटनेचा कास्ट्राईबचे राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर वांढेकर, श्याम थोरात यांनी देखील निषेध नोंदवला. जिल्हा परिषद संघटनेबरोबर कास्ट्राईब संघटना असून, याप्रकरणी हल्लेखोरावर कठोर कारवाई होण्यासाठी कास्ट्राईब संघटना प्रयत्नशील आहे. तर जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी यांना वेठीस धरणे, हल्ले करणे, शिवीगाळ करणे आदी प्रश्नासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली जाणार असल्याचेही कास्ट्राईबच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
