रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेवरुन निर्माण झालेल्या भाऊकीच्या वादातून नगर-औरंगाबाद रोड, अमीर मळा येथील पठाण कुटुंबीयांकडून पीडित कुटुंबीयांच्या सदस्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना व खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या सदरील पठाण कुटुंबीयांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संदीप वाघचौरे, निसार पठाण, नजीर पठाण, विशाल भिंगारदिवे, नजमा शेख, शकीला शेख आदी पिडीत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
पठाण कुटुंबात जागेच्या कारणावरुन भाऊकीचे वाद निर्माण झाले आहेत. सदर जमिनीचे समान वाटप झाले असताना देखील पठाण कुटुंबातील सदस्यांनी पीडित कुटुंबीयांच्या जागेत विनाकारण अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याची मागणी पीडित कुटुंबीय करत आहेत. मात्र तक्रार केल्याचा राग मनात धरुन त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे काम सुरु आहे. पीडित कुटुंबाला वारंवार धमकाविले जात असताना जीव मुठीत धरून ते राहत आहे.
समोरील व्यक्ती पीडित कुटुंबातील व्यक्तींच्या नावाने खोटे गुन्हे दाखल करत आहे. पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासन त्यांचे ऐकूण घेत नाही. पठाण कुटुंबातील व्यक्तींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ते पोलीस प्रशासनाच्या कोणत्याही कारवाईस भीत नाही. त्यांच्या त्रासाला कंटाळून दोन व्यक्तींनी आत्महत्या देखील केली आहे.
संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असताना अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पीडित कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे दाखल करताना शहानिशा करावी व वारंवार धमकाविणाऱ्या पठाण कुटुंबातील सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.