• Thu. Jul 24th, 2025

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही

ByMirror

May 31, 2024

सोमवारच्या बैठकीत सर्वानुमते ठरविणार उमेदवार; त्या छायाचित्रांचा झालेल्या गैरवापरचा निषेध

शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिला गेला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नुकतीच माध्यमिक शिक्षक भवन येथे समन्वय समिती सहविचार सभा पार पडली. यामध्ये सोमवारी (दि. 3 जून) पुन्हा बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत जिल्ह्यातून एकच उमेदवार देण्यासाठीचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, टीडीएफचे कल्याण ठोंबरे, प्रा. श्रीराम लांडगे, छबुराव पानसरे, महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे आदींसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक भवन येथे सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची तिसरी सहविचार सभा पार पडली. यापूर्वी समन्वय समितीच्या 17 मे व 20 मे च्या सभांमध्ये प्रत्येक संघटनांच्या वरिष्ठ पातळीवरील जे काय निर्णय होतील ते निर्णय त्या संघटने पुरतेच मर्यादित राहतील. त्या निर्णयांना जिल्हा समन्वय समिती बांधील असणार नाही व समन्वय समिती सर्वानुमते जो उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराच्या पाठिशी सर्व बांधव एकजुटीने काम करणार असल्याचे ठरविण्यात आले होते.

परंतु दोन्हीही झालेल्या बैठकीत काढण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उमेदवार निश्‍चित होत नाही, तोपर्यंत झालेल्या बैठकीच्या छायाचित्रांचा वापर कोणीही करू नये असे आवाहन करण्यात आले. तर छायाचित्रांचा झालेल्या गैरवापरचा समन्वय समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.


जिल्ह्यातून एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समिती प्रयत्नशील आहे. यासाठी सोमवारी बैठक बोलविण्यात आलेली आहे. यामध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्या जाणार आहेत. तर जिल्ह्यातून उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता माध्यमिक शिक्षक भवन येथे बैठक बोलवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *