भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने सन्मान
रात्र शाळेचे प्राचार्य सुसरे यांना मिळालेला पुरस्कार हिंद सेवा मंडळाच्या दृष्टीने अभिमानास्पद -डॉ. पारस कोठारी
अर्धवट शिक्षण सोडलेल्या जास्तीत जास्त युवक-युवतींना रात्र शाळेत केले प्रवेशित
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनिल सुसरे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. विविध कारणांनी अर्धवट शिक्षण सोडलेल्या युवक-युवतींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना रात्र शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना समाविष्ट केल्याबद्दल प्रा. सुसरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा व भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते प्रा. सुसरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार, गजेंद्र गाडगीळ आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितशेठ बोरा म्हणाले की, रात्र शाळेत काम करण्याची मोठी संधी असून, हे कार्य प्रा. सुसरे यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. अनेकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी हा शिक्षक मनापासून कार्य करत असल्याचे कौतुक त्यांनी केले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, आर्थिक अडचण, कौटुंबिक प्रश्न व विविध कारणांनी अनेक युवक-युवतींचे शिक्षण अर्धवट राहते. बौध्दिक क्षमता असताना देखील जबाबदारीच्या ओझ्याखाली अनेकांना शिक्षण घेता येत नाही. अशा युवक-युवतींसह प्रौढांना देखील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या माध्यमातून प्रा. सुसरे यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हिंद सेवा मंडळ संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. या कार्यातून मोठ्या प्रमाणात अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना शाळेत प्रवेशित करुन त्यांना भविष्याच्या वाटा शोधण्याचे व स्वप्न साकारण्याचे बळ निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. सुसरे यांनी हा पुरस्कार शाळेतील सर्व शिक्षकांचा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांचा असून, त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, संस्थेचे सर्व सदस्य, शालेय समिती सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
