दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याबद्दल सन्मान
शालेय परिसरात रेन गेन बॅटरी प्रकल्पाचे भूमीपूजन
नगर (प्रतिनिधी)- दुष्काळी पट्ट्यात विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन हिरवाई फुलविणारे तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथील शिक्षण महर्षी गुलाबराव जोंधळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ दिघे यांना पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने हरित श्रीमंत प्राचार्य म्हणून सन्मान करण्यात आला. तर शालेय परिसरात रेन गेन बॅटरी प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.
सेवानिवृत्त शिक्षक रामनाथ आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी, उपप्राचार्य संजय दिघे, पर्यवेक्षक बी.सी. दिघे, बाबा जगताप, अविनाश बिराडे, संभाजी सुर्वे, भाऊसाहेब दिघे, ओंकार भागवत, ज्योत्स्ना उंडे, रामनाथ आभाळे आदींसह प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य हरिभाऊ दिघे म्हणाले की, रेन गेन बॅटरी मोहीम म्हणजे निसर्गाच्या शहाणपणाशी भागीदारी आहे. रेनगेन बॅटरीमुळे जमिनीतील ओलावा वर्षभर टिकून राहणार आहे आणि त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या लढ्याला नक्कीच यश येऊ शकेल. त्याच वेळेला सर्वत्र पाणी टंचाई भासत असताना त्यावर देखील मात करता येऊ शकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोभी माणसांमुळे सर्वत्र वृक्षतोड झाली, शेततळे आणि बोअरवेल्समुळे जमिनीतील ओलावा संपला आणि आपण आता वाळवंटाकडे वाटचाल करत आहोत. त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु रेनगेन बॅटरीमुळे जमिनीच्या खाली आणि झाडांच्या मुलांना वर्षभर ओलावा निर्माण करता येणार आहे. त्यातून पुन्हा एकदा निसर्गराई सर्वत्र उभी होऊ शकणार असल्याचेही दिघे यांनी सांगितले.
रामनाथ आभाळे म्हणाले की, महाविद्यालयाच्या आवारात रेन गेन बॅटरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये पर्यावरणाबाबतची मोठी आस्था निर्माण होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एकापेक्षा अनेक रेन गेन बॅटरी बसविले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, सन 1972 नंतर संपूर्ण महाराष्ट्रात गेली 52 वर्षे दुष्काळाने सर्व शेतकरी होरपळले आहे. सध्या सर्वत्र ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न भेडसावत आहे. यावर एकच मार्ग तो म्हणजे, जमिनीखालच्या भागात सर्वत्र वर्षभर ओलावा टिकून ठेवायचा आणि त्यासाठी रेन गेन बॅटरी अतिशय उपयुक्त आहे. शेत जमिनीच्या उताराला आडवा 20 फूट लांबीचा, 5 फूट रुंदीचा आणि 8 फूट खोलीच्या खड्ड्यांमध्ये दगड, गोटे टाकून वरच्या बाजूला मुरूम भरायचा आणि पावसाचे पाणी अशा बॅटरीमध्ये सोडून दिल्यामुळे तातडीने पावसाचे पाणी जमिनी खाली जाते आणि त्यातून वाहणार पाणी किंवा ऊन, वारा व प्रकाशामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात थांबते. या प्रकल्पाने पडलेल्या पावसाचे 70 टक्के पाऊस जमिनीखाली साठवता येणार आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग, पाणीटंचाईचा प्रश्न सोडवून हिरवाई तयार करण्यास मदत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कु. पूर्वी गवळी या विद्यार्थिनीने आणि रामनाथ आंधळे सरांनी प्रत्येक पाच हजार रुपये शालेय परिसरात रेन गेन बॅटरी बसवण्यासाठी संस्थेला दिले. पूर्वी गवळी या सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वाढदिवसानिमित्त खाऊचे पैसे या उपक्रमासाठी देऊन ग्लोबल वॉर्मिंगच्या लढ्यात आपण देखील सहभागी असल्याचे स्पष्ट केले.