जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व
शक्ती उपासनेचा खेळ आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक -प्रा. भगवान काटे
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी नगर शहरातील नाना पाटील वस्ताद तालीमचे मल्ल पै. चैतन्य शेळके व पै. ऋषिकेश लांडे यांची निवड झाल्याबद्दल नगर-कल्याण रोड व नालेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पै. मिलिंद जपे, पै. अशोक घोडके, नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव पै. बाळासाहेब भापकर, विजय गाडळकर, पै. काका शेळके, प्रा. भगवान काटे, राजाराम रोहकले, बाबासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.
प्रा. भगवान काटे म्हणाले की, महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्राला मोठी परंपरा आहे. या मातीने जगाला कुस्ती हा खेळ दिला असून, अनेक मल्ल या मातीतून घडले आहेत. प्राचीन काळापासून भारतात हा खेळ खेळला जातो. शक्ती उपासनेचा खेळ आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक बनला आहे. व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या युवकांनी या खेळाकडे वळण्याची गरज आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करुन युवकांना व्यायामाकडे वळण्याचे आवाहन केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, लोपपावत चाललेला कुस्ती खेळ टिकवण्याचे काम युवा मल्ल करत आहे. शहरासह जिल्ह्यातून अनेक युवा खेळाडू पुढे येत असून, त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पैलवान शेळके व लांडे हे शहराचे भूषण असून, त्यांनी कुस्ती खेळातून नाव उंचावले आहे. शहरातील अनेक कुस्तीपटूंनी राज्यात आपला दबदबा निर्माण केल्याचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळू भापकर यांनी कुस्ती खेळात यशासाठी सातत्य व कष्ट करण्याची तयारी महत्त्वाची असते. सरावाने मल्ल तयार होत असतो. शहरातून महाराष्ट्र केसरी घडविण्याचे स्वप्न साकारले जाण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहे. मल्लांनी आपले ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी. शहराला कुस्ती खेळाचा मोठा वारसा असून, सर्व कुस्तीप्रेमीचे मल्ल घडविण्यास योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याची निवड चाचणी स्पर्धा सरला बेट येथे नुकतीच पार पडली. या निवड चाचणीत माती विभाग 70 किलो वजन गटात पै. चैतन्य शेळके व गादी विभाग 92 किलो वजन गटात पै. ऋषिकेश लांडे यांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात नगर शहरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या स्पर्धेत दोन्ही मल्ल नगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दोन्ही मल्ल शहरातील पै. नाना पाटील वस्ताद तालीम येथे पै. अनिल म्हस्के वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखालीचे सराव करत आहे. या निवडीबद्दल दोन्ही मल्लांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.