• Tue. Jul 1st, 2025

जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या गुंफाताई कोकाटे यांची निवड

ByMirror

Jun 29, 2025

6 जुलै रोजी निमगाव वाघात रंगणार संमेलन; राज्यातील साहित्यिकांची राहणार उपस्थिती

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रविवार दि. 6 जुलै रोजी होणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्या गुंफाताई कोकाटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन होत असून, हे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनात राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार आहे.


गुंफाताई कोकाटे या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथील प्राचार्या आहे. 26 वर्षापासून त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. महाविद्यालयात त्या मराठी विभाग प्रमुख असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळाच्या त्या व्याख्यात्या व ग्रंथ अन्वेषक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने त्यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *