प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री विशाल गणेशाला साकडे
दिव्यांग नचिकेत बोडखे यांनी देखील केली मनोभावे प्रार्थना
नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या वतीने मंगळवारी (दि.8 एप्रिल) प्रार्थना करण्यात आली. तर दिव्यांग असलेल्या नचिकेत बोडखे या बालकाने देखील अरुणकाका आजारातून बरे होण्यासाठी श्री गणेशाला साकडे घातले.
याप्रसंगी श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते, चेअरमन आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक बाबासाहेब बोडखे, संचालक महेंद्र हिंगे, माजी संचालक बाळासाहेब राजळे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष तथा संचालक आप्पासाहेब जगताप, प्रा. बाबा शिंदे, सुभाष भागवत, डाके सर, संतोष अडकित्ते, प्रकाश धोंडे, शेळके सर आदी उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, आमदार अरुणकाका जगताप यांनी शिक्षक, शिक्षकेतरांचे नेहमीच प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांचे आधार व नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अरुणकाका बरे व्हावे, ही सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात शिक्षकांनी प्रार्थना केली. याप्रसंगी शिक्षक परिषद, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक सोसायटी, जुनी पेन्शन कोअर कमिटी आदी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.