• Tue. Nov 4th, 2025

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मुला-मुलींमध्ये आठरे पाटील पब्लिक स्कूलचा संघ विजयी

ByMirror

Oct 7, 2024

12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल व 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूलने पटकाविले विजेतेपद

फुटबॉल खेळ वाढविण्यासाठी खेळाडू बरोबरच प्रशिक्षक व पंच घडविण्याचे सातत्याने प्रयत्न -नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार प्रेक्षकांनी अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अनुभवला. विविध गटात झालेले अंतिम सामने रंगले होते. यामध्ये मुलांच्या 16 वर्ष वयोगटात व मुलींच्या 17 वर्षा आतील संघात आठरे पाटील पब्लिक स्कूलचा संघ विजयी ठरला. 16 वर्ष वयोगटात सलग दुसऱ्यांदा आठरे पाटील स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकाविले. मुलांच्या 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल व 14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) संघाने विजय मिळवला. विजेत्या संघातील खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला होता.


विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघास अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांच्या हस्ते चषक व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर पाहुण्यांच्या हस्ते विविध श्रेणीतील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसं देण्यात आली. यावेळी अहमदनगर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख सॅव्हिओ वेगास, डॉ. अनिल आठरे, फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, जोगासिंह मिनहास सचिव रौनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, सहसचिव विक्टर जोसेफ, खजिनदार ऋषपालसिंह परमार, सहखजिनदार रणबिरसिंह परमार, फिरोदिया शिवाजीयन्स कमिटीचे पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी, जॉय जोसेफ, सचिन पाथरे, अभिषेक सोनवणे, भाऊ भिंगारदिवे, राजू पाटोळे, धावपटू जगदीप मक्कर, प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य बी.बी. अंबाडे, आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शहरात फुटबॉल खेळ रुजत असून, अनेक चांगले खेळाडू पुढे येत आहे. स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. फुटबॉल खेळ वाढविण्यासाठी विविध स्पर्धा व प्रशिक्षण शिबिर घेऊन चांगले खेळाडू बरोबरच प्रशिक्षक व पंच घडविण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या स्पर्धेत 32 शाळांच्या संघांनी सहभाग घेतला, तर मुलींचे संघ देखील यामध्ये सहभागी झाले होते. अत्यंत रोमांचक सामने या स्पर्धेतून अनुभवता आले. या स्पर्धेनंतर लगेचच महाराष्ट्र लीग स्पर्धेची तयारी करण्यात आली असून, आपला संघ महाराष्ट्राबाहेर खेळणार आहे. त्यांना अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार असून, खेळाडूंनी या संधीचा फायदा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


मनोज वाळवेकर म्हणाले की, या स्पर्धेची भव्यता दरवर्षी वाढत चालली आहे. शालेय संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वांच्या सहयोगाने ही स्पर्धा यशस्वी झाली. फुटबॉल खेळाला चालना देण्यासाठी नवोदित खेळाडूंना फिरोदिया शिवाजीयन्सने एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. पुढील वर्षी देखील फिरोदिया शिवाजीयन्सच्या माध्यमातून भव्य-दिव्य शालेय फुटबॉल स्पर्धेचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अनिल पाटील यांनी खेळातून मुलांचे उत्तम व्यक्तीमत्व घडते. मैदानातून मुला-मुलींचा सर्वांगीन विकास होऊन खेळाडूवृत्ती निर्माण होत असल्याचे सांगून, दरवर्षी उत्तमपणे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.


अंतिम सामना 12 वर्ष वयोगटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील पब्लिक स्कूल यांच्यात झाला. या रंगतदार सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलकडून जयवर्धन विखे पाटील याने 1 गोल करुन आपल्या संघाचा विजय निश्‍चित केला. शेवट पर्यंत आठरे पाटील स्कूलला एकही गोल करता आला नाही. 1-0 गोलने प्रवरा पब्लिक स्कूलने मागील दोन वर्षापासून सलग विजेता ठरलेल्या आठरे पाटील स्कूलचा पराभव केला. आर्मी पब्लिक स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.


14 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) विरुध्द आठरे पाटील पब्लिक स्कूल यांच्यात अटातटीचा सामना रंगला होता. दोन्ही संघांनी आक्रमक खेळी केली. आदर्श साबळे (आर्मी पब्लिक स्कूल) व अशोक चांद (आठरे पाटील) यांनी प्रत्येकी 1 गोल केल्याने सामना बरोबरीत टाय ब्रेक झाला. शेवटी पेनल्टीवर आर्मी पब्लिक स्कूलचे प्रतिक शेळके, आदर्श साबळे व सिध्दांत याने प्रत्येकी 1 गोल केला. तर आठरे पाटीलचे ओम लोखंडे व इंद्रजीत गायकवाड याने प्रत्येकी 1 गोल केला. पेनल्टीवरील 3-2 गोलने आर्मी पब्लिक स्कूलचा संघ विजयी झाला. सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.


16 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) चा सामना शेवट पर्यंत रंगला होता. दोन्ही तुल्यबळ संघ स्पर्धेच्या अंतिम क्षणापर्यंत गोल करण्यासाठी एकमेकांना भिडले होते. यामध्ये कृष्णा टेमकर (आठरे पाटील) व आयुष शिर्के (आर्मी स्कूल) यांनी प्रत्येकी 1 गोल केल्याने हा सामना टाय ब्रेक झाला. शेवटी पेनल्टीवर आठरे पाटील पब्लिक स्कूलकडून भानुदास चांद, अभय थोरात व कृष्णा टेमकर याने प्रत्येकी 1 गोल केला. आर्मी पब्लिक स्कूलकडून आयुष शिर्के व अष्मीत पांडे यांना गोल करता आला. पेनल्टीवर 3-2 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या संघाने विजय मिळवला. रामराव आदिक पब्लिक स्कूलचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला.


17 वर्षा आतील मुलींच्या संघात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एसीसी ॲण्ड एस) यांच्यात सामना झाला. यामध्ये आठरे पाटील पब्लिक स्कूलने 1-0 गोलने सलग तीन वर्ष विजेत्या ठरलेल्या आर्मी पब्लिक स्कूलचा पराभव केला. आठरे पाटीलची वेदिका ससे हिने केलेला एकमेव गोल संघाच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरला.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुमित सिंग, सलमान शेख, प्रियंका अवारे, सोनिया दोसानी, सुयोग महागडे, ऋतिक छजलाणी, क्लेमेंट, जेरीमी, जॉय जोसेफ यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे निरीक्षक जेव्हिअर स्वामी हे होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. दोन गटात झालेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी पालकांसाठी देखील विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. खेळाडूंच्या हातावर विविध प्रकारचे टॅटू देखील काढून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण अश्‍विनी पुणतांबेकर व भरत पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्षा बोरा व राहुल क्षीरसागर यांनी केले.

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू पुढील प्रमाणे:-
12 वर्ष वयोगट- जितेन गायकवाड (प्रवरा पब्लिक), रुद्राक्ष वाघुले (आठरे पाटील).
14 वयोगट- अशोक चांद (आठरे पाटील), विरेंद्र वीर (आर्मी स्कूल).
16 वयोगट- भानुदास चांद (आठरे पाटील), आयुष शिर्के (आर्मी स्कूल).
या स्पर्धेतील उद्योन्मुख खेळाडू म्हणून सौरभ खंडेलवाल (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट) याचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *