आमदार बच्चू कडू करणार नेतृत्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.25 सप्टेंबर) मुंबई मंत्रालयावर आंदोलन होणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे, उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, उत्तर जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते यांनी केले आहे.
दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, घरकुल मिळावे, दिव्यांगांची कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळा आणि जागा मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. मुंबई मंत्रालयाच्या मुख्य गेटवर सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
राज्यातील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, अंध, मूकबधीर, दिव्यांगांनी आपापल्या पद्धतीने मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या आंदोलनात सहभागी होण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी हे आंदोलन असून, मोठ्या संख्येने या आंदोलनात उतरण्याचे सांगण्यात आले आहे.