वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देताना पत्रकारांनी बळ दिले -अरुण खिची
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने केडगावमध्ये पोस्टमन व पत्रकार बांधवाचा सन्मान करण्यात आला. अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची व माजी प्राचार्य डॉ. श्रीधर दरेकर यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, प्रसिध्द कलावंत सुनिल महाजन, उद्योजक गिरीश मुळे, पत्रकार विठ्ठल शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अरुण खिची म्हणाले की, अरुणोदय क्रांती सेवा संघटनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात शासन, न्यायप्रशासन, जिल्हा प्रशासनाशी पत्र व्यवहार करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्य सुरु आहे. वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देताना पत्रकारांनी बळ देण्याचे काम केले. तर वेळोवेळी वस्तुस्थिती मांडून वंचितांचे प्रतिनिधित्व केले. पत्रकारांच्या पाठबळाने अनेकांना न्याय मिळवून देण्यास मदत झाली. तर पत्राच्या माध्यमातून शासन, न्यायालय व जिल्हा प्रशासन दरबारी संदेश पोहचविण्याचे कार्य कर्तव्यनिष्ठ पोस्टमन यांच्यामुळे शक्य झाले. दोन्ही घटकांच्या कार्याने संघटनेच्या कार्याला बळ प्राप्त झाले असून, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा सन्मान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात पत्रकार बाजीराव खांदवे, अनिल हिवाळे, पोस्टमास्तर संतोष यादव, पोस्टमन शिवाजी कांबळे, अंबादास सुद्रीक, अनिल धनावत, केडगावच्या प्रथम महिला पोस्टमन कल्पना घोडे, सुनिल जाधव, संजू पवार, बाबासाहेब वायकर यांचा मानपत्र, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. श्रीधर दरेकर यांनी सन 1992 मध्ये अयोध्या मध्ये कारसेवा करताना तेथील प्रसंगांना उजाळा दिला. जेष्ठपत्रकार भूषण देशमुख यांनी रामायण व महाभारतात घडलेल्या प्रसंगाची तुलना आजच्या लोकशाहीतील सद्यस्थितीत घडत असलेल्या घटनेशी करुन परिस्थितीत बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन केले. प्रसिध्द कलावंत सुनिल महाजन यांनी तबल्याच्या तालावर श्रीरामाचे गीत सादर केले. यावेळी अभय अकोलकर, रमेश बनभेरु, घोडे, केतन खिची, नयना चायल, दुर्गा खिची आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा घोलप यांनी केले. श्यामा मंडलिक यांनी आभार मानले.