व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून प्रबोधिनी दिव्यांगांना समाजात उभे करत आहे -बाबासाहेब महापुरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक दृष्टया दिव्यांगत्व असलेल्या व अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाची गरज आहे. शिक्षणोत्तर उपक्रमातून दिव्यांगाना आर्थिक दृष्टया सक्षम व त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम प्रबोधिनी कार्यशाळा करत आहे. तर व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून दिव्यांगांना समाजात उभे केले जात आहे. संस्थेच्या संस्थापिका रजनी लिमये यांनी 55 वर्षापूर्वी लावलेल्या रोपटयाचे वटवृक्षात रुपांतर झाले असून, त्याच्या सावलीने दिव्यांगाना जगण्याची दिशा दाखवली असल्याचे प्रतिपादन सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी केले.
दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या प्रबोधिनी संस्थेच्या कार्यशाळेत खंडेनवमीच्या मुहुर्तावर यंत्रसामुग्रीची पूजा महापुरे यांच्या हस्ते झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रबोधिनी ट्रस्ट नाशिक संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी ढवळे, उपाध्यक्ष मंगल सौदिकर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप भगत, सचिव रमेश वैद्य, व्यवस्थापिकीय अधीक्षक संगीता पाटील, सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख, संचालक संभाजी गुठे आदी उपस्थित होते.

पुढे महापुरे म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन दिव्यांगांनी दिव्यांगत्वावर मात करुन आपला वेगळा ठसा समाजामध्ये उमटवला आहे. शासनाने प्रौढ दिव्यांगासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्था उभारुन दिव्यांगांना प्रशिक्षण देणे काळाची गरज झालेली आहे. प्रबोधिनी ट्रस्ट करत असलेल्या कार्याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांगांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे व स्वंयरोजगाराच्या माध्यमातून समाजात ताठ मानेने वावरता यावे, यासाठी प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळेमधून फाईल्स, पेपर डिश, द्रोण, बॉक्स फाईल, बुक बाईडिंग, स्क्रीन प्रिटींग, खादयपदार्थ, बागकाम व विविध उपक्रमातून दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन त्यांना वेगवेगळया कंपनी मध्ये नोकरीस लावून देण्याचे कार्य सुरु आहे.
