विजयादशमीला लोकमकात्या विसर्जीत करुन लोकशाही दसरा साजरा करण्याचा निर्णय
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी घरकुल वंचित असलेल्या बहिणींना आधार देण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यातून लाडकी माई भूमीगुंठा योजना राबविण्याची हमी देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. विजयादशमीला 12 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारकात आणि शेजारच्या नाल्यावर लोकमकात्या विसर्जन करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर हा दसरा लोकशाही दसरा साजरा करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर देशातील सत्तापेंढारी, ताबेमार, सत्तामार, टक्केवारी आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या आधुनिक रावणांना लोकमकात्या घोषित करून त्यांचे विसर्जन करण्यात येणार असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
भारतात हजारो वर्षांपूर्वी मारल्या गेलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. मात्र देशात लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे काम सत्तापेंढारी यांनी सुरू ठेवले आहे. त्यामुळे आधुनिक रावणांना मतपेटीच्या माध्यमातून विसर्जीत करणे हा सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग आहे. प्रत्येक मतदार हा प्रभू रामचंद्रांचा सैनिक ठरला पाहिजे आणि आधुनिक रावणांचे येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्याचा संघटनांनी निश्चय केला आहे.
कोट्यावधी बहिणींना स्वतंत्र्याच्या 77 वर्षानंतर सुद्धा राहण्यासाठी निवारा नाही. अनेक बहिणी झोपडपट्टीत राहतात नालीच्या शेजारी उघड्यावर आंघोळ करतात. यातून आधुनिक सीतामाईचा वनवास आजचे कार्यकर्ते संपवू शकलेले नाही. सध्याची लाडकी बहीण योजना म्हणजे मतदार बहिणींच्या आर्थिक दुबळ्यापणाचा सर्रास गैरफायदा घेण्याचे काम सत्ताधारी करत आहे. तर त्यांच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा उचलण्याचा विडा त्यांनी उचलला गेला आहे. मात्र बहिणींचा सर्वात महत्त्वाच्या घरांचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
दसऱ्याचे पावित्र्य आणि त्यामागचे कर्तृत्व प्रत्येक नागरिकांनी आणि मतदाराने स्वीकारून मतदारांची फसवणूक करणाऱ्या सत्तापेंढाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. लोकभक्ती, ज्ञानभक्ती व कर्मभक्ती असणाऱ्या उमेदवाराला फक्त लोकशाहीचे पवित्र मतं देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकमकात्या विसर्जनासाठी व लोकशाही दसरा साजरा करण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, संदीप पवार, वीर बहादूर प्रजापती, ओम कदम, कैलास पठारे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.
