डोंगरे यांचे कार्य समाजाला विकासात्मक दिशा देणारे -राजेंद्र सानप
अहमदनगर (प्रतिनिधी)- कला, साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, ज्योतीताई गडकरी व शमुवेल गायकवाड यांनी गौरव केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, अनिताताई काळे, साहेबराव बोडखे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, डॉ. सुलभा पवार, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, सुभाष सोनवणे, कवयित्री प्रतिभा खैरनार, कवी सखाराम गोरे गणेश भगत, जालिंदर बोरुडे आदींसह युवक-युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात डोंगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगेरे यांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. सामाजिक योगदान देणाऱ्यांचा सातत्याने गौरव करुन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबळ वाढविण्याचे कार्य ते करत आहे. सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून समाजाला विकासात्मक दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाच्या विकासासाठी झटत आहे. त्यांनी आपले जीवन समाजासाठी वाहून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.