• Thu. Oct 30th, 2025

पर्यावरण दिनानिमित्त निसर्गपालांचे वृक्षरोपण

ByMirror

Jun 6, 2024

पावसाळ्यात निसर्गपाल मोठ्या प्रमाणात झाड लावण्याची आग्रही भूमिका घेणार

वृक्ष नाहिसे झाल्यास डायनासोर प्रमाणे मानव जात संपल्याशिवाय राहणार नाही -ॲड. गवळी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी धर्माधिकारी मळा येथील फुलारी बाल उद्यानात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गपालांनी वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. या पावसाळ्यात निसर्गपाल आणि बालनिसर्गपाल यांनी मोठ्या प्रमाणात झाड लावण्याची आग्रही भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले.


या वृक्षरोपण अभियानात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, प्रफुल्ल नातू, हर्षिता दासवानी, वैशाली कोळंबे, वृषाली दानी, आसावरी नातू, ऋचा तांदूळवाडकर, प्रज्ञा दंडवते, सुप्रिया शहापूरकर, संजय बारस्कर, संदीप पवार, प्रकाश थोरात, महेश लेले, रेखा दासवाणी, सुवर्णा लेले, वंदना ताठे, रत्नाकर कुलकर्णी, मनसुख गांधी, प्रदीप नातू, श्रीकांत खरे, अरुण शिंदे, माधवी दांगट, शिरीष सुगंधी, शाहीर कान्हू सुंबे आदी उपस्थित होते.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न फक्त निसर्गपाल होऊन सुटणार नसून, त्यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षरोपणाची मोहिम राबवावी लागणार आहे. भू तळावरुन वृक्ष नाहिसे झाल्यास डायनासोर ज्या पद्धतीने संपले, त्याच मार्गाने संपूर्ण सजीव सृष्टी आणि मानव जात संपल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने माणसाला अजून फार मोठी संधी दिली आहे. याचा वापर करून झाडे लावली पाहिजे. त्याशिवाय दुसरा कोणताही जवळचा मार्ग शिल्लक राहिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक सब्बन यांनी देशातील व जगातील कोणतीही सरकार पर्यावरणाचा प्रश्‍न सरकारी पातळीवर सोडू शकणार नाही. यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यावरणाचा प्रश्‍न लोकसभागाशिवाय सुटू शकणार नाही. लावलेले झाड सगळ्यांनी मिळून पुढील तीन वर्षासाठी किमान जगवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आसावरी नातू यांनी वृक्षरोपणासाठी वृक्ष उपलब्ध करुन दिले. गिरीश सुगंधी यांनी पुढील तीन वर्षासाठी स्वतःच्या बोअरवेल मधून झाडांना पाणी देण्याचे कबूल केले.


सावेडीच्या पश्‍चिमेला दररोज मोठ्या प्रमाणात झाड तोड करून कोळसा भट्टी लावली जाते. त्यामुळे परिसरात प्रदुषण होऊन मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत आहे. सकाळी फिरणाऱ्या लोकांना प्राणवायू ऐवजी कर्बवायू घ्यावा लागत आहे. उपस्थित निसर्गपालांनी सदर परिसर कोळसा भट्टी मुक्त करण्याची मागणी केली. तर कोणाला नगरसेवक व्हायचे असेल तर त्याने उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर सहा महिने किमान दहा हजार झाडे प्रभागात लावण्याचे स्पष्ट केले. माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी पुढील निवडणुकीमध्ये उभे राहण्याअगोदर प्रभागात दहा हजार झाडे लावण्यासाठी मतदारांकडे घरोघरी जाऊन आग्रह धरुन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *