कला आणि हस्तकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतली खगोलशास्त्राची माहिती
विद्यार्थ्यांनी साकारले उत्कृष्ट कलाकृतीचे नमुने
नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी तारांगणाची प्रतीकृती उभी करुन खगोलशास्त्राची माहिती जाणून घेतली. ज्ञान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळावे व त्याची अधिकची माहिती व्हावी या उद्देशाने तारांगणाची थीम घेऊन प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडल्या होत्या. यामध्ये तारांगणाबद्दल माहिती देणारे विविध प्रकल्प, विविध हस्तकौशल्याच्या वस्तू, व्यक्तीचित्र, निसर्ग चित्रांचा या प्रदर्शनात समावेश होता. विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कलाकृती पाहून पाहुण्यांसह पालक देखील अवाक झाले.
विद्यार्थ्यांनी इसरो, थ्रेड आर्ट, पेन्सिल स्केच, टँग्राम, सूर्यकिरण, वॉटर कलर स्केच, बटन आर्टचे प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. याप्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कर्नल परब स्कूलच्या सीईओ गीता परब, संचालक कर्नल दिलीप परब, रिकीराज परब, मुख्याध्यापिका अर्पिता रणनवरे, सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना योगेश शिंगवी आदींसह कर्नल परब व सनबीम्सच्या सर्व शिक्षका उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका अर्पिता रणनवरे म्हणाल्या की, कला अविष्कारातून समाधानाची जाणीव निर्माण होत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी क्षमता असून, ती ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हसत-खेळत विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भावना शिंगवी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या तारांगणासाठी वर्षभर सावेडी येथील सनबीम्स प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांकडून आर्ट ॲण्ड क्राफ्टची तयारी करुन घेण्यात आली होती. यासाठी शाळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसह त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्नल परबचे सीईओ गीता परब व संचालक रिकीराज परब यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. तर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाची शास्त्रीय माहिती उपस्थित पाहुण्यांसह पालकांना दिली.