फिनिक्सचे नेत्र शिबिर गोर-गरीबांसाठी आधार -महापौर ज्योतीताई गाडे
63 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स फाऊंडेशनचे नेत्र शिबिर गोर-गरीबांसाठी आधार ठरत आहे. लाखो रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली आहे. या निस्वार्थ सेवेचा लाभ 3 लाख 76 हजार गरजूंना मिळाला आहे. हे शिबिर घेत असताना कायम स्वरुपी सेवेच्या उद्देशाने फिनिक्सच्या माध्यमातून स्व. शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाला सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्वासन महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर गाडे बोलत होत्या. यावेळी नगरसेविका गीतांजली काळे, आशाताई डागवाले, सुनिता भिंगारदिवे, पौर्णिमा गव्हाळे, नगरसेवक निखील वारे, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, योगीराज गाडे, पै. महेश लोंढे, मोहित पंजाबी, अवधूत फुलसौंदर, ह.भ.प. कोऱ्हे महाराज, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, माजी सरपंच राम पानमळकर, सोनू भुजबळ, मयुर पाखरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा चौधरी, साहित्यिक सुनिल राऊत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे महापौर गाडे यांनी फिनिक्सच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. असे निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाल्यास समाजातील प्रश्न सुटून देशाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे म्हणाले की, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टीदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करुन दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर गाडे यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवकांचा फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. ती आहे म्हणून!…, या लघुपटाला बक्षीस मिळाल्याबद्दल सुनिल राऊत यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. गीतांजली काळे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा व ह.भ.प. कोऱ्हे महाराज यांनी यावेळी या उपक्रमाचे कौतुक करुन या उपक्रमासाठी सहकार्याची भावना व्यक्त केली.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. या शिबिरात 417 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 63 शिबीरार्थींवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासोबतच जेष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या देखील मोफत करण्यात आली. गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल राऊत यांनी केले. आभार नेताजी भाबड व राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे यांनी परिश्रम घेतले.
