नागरदेवळ्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराला ग्रामीण भागातून प्रतिसाद
बौद्ध पौर्णिमा आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुध्द जयंती (बौध्द पौर्णिमा) व छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 348 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर 73 गरजूंवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया पार पडणार आहे.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात झालेल्या शिबिराप्रसंगी फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जलसंपदा विभागाचे माजी अधिकारी प्रमोद खडामकर, मयाबापू राशीनकर, ज्ञानेश्वर भांड आदींसह शिबिरार्थी रुग्ण व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रमोद खडामकर म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनचे शिबिर एका कुटुंबाप्रमाणे प्रत्येकाची काळजी घेऊन त्यांना आरोग्यसेवा दिली जाते. शिबिर फक्त राबविण्यासाठी नव्हे, तर गरजूंना व शेवटच्या घटकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. आलेल्या शिबिरार्थींची मधुमेह, रक्तदाब आदी तपासण्या करुन घेतले जातात. 32 वर्षाची अनुभवाच्या शिदोरीने शंभर टक्के यशस्वी शस्त्रक्रियेचा विश्वास सर्वसामान्यांना आल्याने राज्यातून या शिबिरात रुग्ण येत असल्याचे सांगून, फिनिक्सच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टीदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे केले जातात. महागडी उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरची गोष्ट असून, या शिबीराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरविण्यात येत आहे. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिबिरात निवड झालेल्या रुग्णांची पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी विशाल भिंगारदिवे, सौरभ बोरुडे, आप्पासाहेब काळे आदींसह फिनिक्सच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.