नेत्रदान व अवयवदानची दिंडीतून जागृती; 23 वर्षापासूनचा अविरत उपक्रम
वारकऱ्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची दिंडी सुखकर होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यात आली. शहरातून मार्गक्रमण झालेल्या विविध दिंडीतील हजारो वारकऱ्यांची तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. तर दिंडीत मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानची जागृती करण्यात आली.
गेल्या 23 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे हा उपक्रम राबवत असून, दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज (नाशिक), मुक्ताई महाराज (जळगाव), जंगले शास्त्री महाराज (डोंगरगण) आदी लहान-मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. ज्या वारकऱ्यांना औषधोपचाराची गरज भासली त्यांना मोफत औषधोपचार देखील करण्यात आले.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेतून पांडूरंगाच्या भक्तीचा आनंद मिळतो. वारकरी सांप्रदाय समाज जागृतीचे कार्य करत असून, त्यांच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान चळवळ यशस्वी होणार आहे. वारकऱ्यांना आरोग्य सेवा देताना दिंडीत नेत्रदान व अवयवदान चळवळीची जागृती देखील सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी आरोग्य जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनला महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प. जंगले शास्त्री महाराज यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आरोग्य सेवेसाठी डॉ. एस.जे. खन्ना, डॉ. सुहास वाळेकर, इंजि. अनिल साळुंके, केमिस्ट असोसिएशनचे संचालक सागर फुलसौंदर, वैभव दानवे, गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, सुभाष दांगट, कृष्णा फुलसौंदर आदींनी योगदान दिले.