ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर, अभिजित आहेर यांचा सत्कार
सामाजिक समरसतेला चालना देणारे अधिकारी समाजासाठी दिशा देतात -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून विशेष यश संपादन करणारे ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्वर मुखेकर, आणि अभिजित आहेर या तिघा गुणवंतांचा फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते तिन्ही गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, या तिघा तरुणांनी आपल्या मेहनतीने व चिकाटीने प्रशासनातील उच्च पदावर पोहचून संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण नगर जिल्ह्याला अभिमान वाटावा, असे हे प्रेरणास्रोत तरुण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे हे केवळ वैयक्तिक विजय नसून, तो समाजासाठीही एक आदर्श ठरतो. आता या अधिकाऱ्यांनी गोरगरीब आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी संवेदनशीलतेने काम करावे. अधिकाऱ्यांची खरी ओळख त्यांच्या पदाने नव्हे, तर त्यांच्या कामगिरीने ठरते. सामाजिक समरसतेला चालना देणारे अधिकारी समाजासाठी दिशा देतात. ही भावना व जाणीव ठेऊन हे अधिकारी काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या तीनही यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, परीक्षा उत्तीर्ण होवून आपल्यावर एक मोठी जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत लोकहिताच्या कामात न्याय द्यायचा आहे. फिनिक्सने उभे केलेले सामाजिक कार्य देखील आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. जिल्ह्यातून मिळणारा सन्मान व कौतुकाने आणखी उत्तम कार्य करण्याची उमेद मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.