जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
59 शिबीरार्थींवर होणार मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया; राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरुडे यांचा सत्कार
नगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशन सर्वसामान्य वर्गातील दृष्टीहीनांसाठी देवदूत ठरले आहे. या चळवळीच्या 33 वर्षाच्या खडतर प्रवासात अनेक अडचणींवर मात करुन नेत्रदानाची मोठी सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीच्या माध्यमातून दृष्टीदोष असलेल्या गरजू घटकांना आधार मिळत आहे. जालिंदर बोरुडे यांच्या सामाजिक कार्याचा समाज व शासनाकडून गौरव होण्याची अपेक्षा दिलासा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आठरे यांनी केले.
जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आठरे बोलत होत्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार, संजय ताजने, इंजि. वैभव दानवे, इंजि. सौरभ बोरुडे, मोहन कुऱ्हे आदींसह ग्रामस्थ व जिल्ह्यासह राज्यातून आलेले शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी, शेतकरी व गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे दृष्टीदोष दूर करुन त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम फिनिक्स फाऊंडेशन करत आहे. सर्व महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने साजरे करुन दर महिन्याला या शिबिराचे आयोजन केले जाते. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे योगदान सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शरद झोडगे म्हणाले की, फिनिक्सच्या सामाजिक कार्यामुळे गावाचे नाव राज्यभरात उंचावले गेले आहे. नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान चळवळीला या गावातून ऊर्जा मिळाली. जालिंदर बोरुडे यांनी ग्रामस्वच्छते पासून सुरू केलेली ही चळवळ 1991 साली नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान चळवळीकडे वळाली. 33 वर्षाचा टप्पा गाठत असताना लाखो लोकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर हजारो लोकांना नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून नवदृष्टी मिळवून देण्याचे फिनिक्सने केले आहे.
फिनिक्सच्या माध्यमातून उभारले जात असलेल्या नेत्रालयासाठी आर्थिक मदत उभी करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल शिबीरार्थी व नागरदेवळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फिनिक्स फाऊंडेशनच्या नियोजित नेत्रालयाच्या बांधकामासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांनी 51 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली.
नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली. या शिबिरात 430 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 59 शिबीरार्थींवर पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर खरपुडे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव बोरुडे, ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, विशाल भिंगारदिवे, गिरीश पाटील, अनिल बनसोडे, दत्ता दळवी यांनी परिश्रम घेतले.