कुटुंबीयांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे दिव्यांग व्यक्तीचे कुटुंबीय चिंतेत
पीपल्स हेल्पलाइनचे शिष्टमंडळ दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची घेणार भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटबंधारे विभागाने 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीस करार संपल्याचे कारण देवून व्यावसायिक गाळा खाली करण्याचे आदेश दिल्याने त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनने दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष ना. बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली असून, मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे बच्चू कडू यांची याबाबत संघटनेचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी महाराष्ट्र शासनाने 2008 साली शासकीय जमिनीची विल्हेवाट करणे, संदर्भातील नियम 1971 मध्ये क्रांतिकारक बदल केला आणि दिव्यांगांसाठी सरकारी जमीन देण्याबाबतचे आदेश त्यामध्ये नमूद केले आहे. या आदेशाप्रमाणे शहरातील 80 टक्के दिव्यांग असलेले आदिनाथ केरूजी बोरुडे यांना पाटबंधारे विभागाने दोनशे चौरस फुटाची जागा अहमदनगर कार्यालयांतर्गत भाडेतत्त्वावर दिलेली आहे. त्या ठिकाणी बोरुडे झेरॉक्स मशीन चालवतात आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यांना एक दिव्यांग मुलगी असून, त्याशिवाय त्यांची बायको आणि कुटुंबातील इतर लोक त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. परंतु पाटबंधारे विभागाने 21 जुलै रोजी नोटीस काढून आदिनाथ बोरुडे यांनी सदरील जागा खाली करून द्यावी असा आदेश दिला. त्यामुळे कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बोरुडे यांनी पाटबंधारे विभागाला करार वाढविण्याची विनंती केली. परंतू त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून जागा खाली करण्याचे आदेश काढले आहे. 2008 साली महसूल कायद्यामध्ये जो बदल करण्यात आला, त्यामध्ये विकलांग व्यक्ती म्हणजे दिव्यांग व्यक्तीची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. त्याशिवाय मुख्य नियमामध्ये विकलांग व्यक्तींना जमीन देणे बाबतचा नियम समाविष्ट करण्यात आला आणि अशी जागा दोनशे फुटापर्यंत देण्याबाबतची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. पाटबंधारे विभागाला कायद्याशी विसंगत कृती करता येणार नाही, परंतु पाटबंधारे खाते महाराष्ट्र शासनाचे नियम पाळायला तयार नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेवून लक्ष वेधणार आहे.
