पीएफ पावत्या, मेडिकल बिलांना गती; फरक बिल, डीसीपीएस, एनपीएस तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना
आमदार दराडे यांच्या माध्यमातून गणित-विज्ञान प्रदर्शनांसाठी 1 कोटींचा निधी; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक संघटनांची सहविचार बैठक रविवारी (दि. 25 जानेवारी) शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पीएफच्या पावत्या व मेडिकल बिल मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात आले असून, पुढील महिन्यापासून पीएफ पावत्या व मेडिकल बिल मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर यांच्यासह शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष संजय चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे सचिव संभाजी पवार, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, अशोक आव्हाड, तौसिफ शेख, देविदास पालवे, प्रसाद शिंदे, अविनाश साठे, बडे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
आमदार किशोर दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे व वैभव सांगळे यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान शिक्षकांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, प्रशासकीय प्रश्न व आर्थिक बाबींबाबत मांडणी केली. या सर्व बाबींची तात्काळ दखल घेत आमदार दराडे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न त्वरित सोडविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
बैठकीत शिक्षकांचे फरक बिल, डीसीपीएस व एनपीएसच्या प्रलंबित रकमा तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पीएफच्या पावत्या मिळण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करून त्या पुढील आठवड्यापर्यंत देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मुख्याध्यापक व अनुकंपा मान्यता प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेण्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. मेडिकल बिल पुढील महिन्यात मंजूर करण्याबाबत वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांनी सहमती दर्शवली आहे.
शिक्षण विभागात कोणत्याही कामासाठी शिक्षकांची अडवणूक होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या असून, यासंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन आमदार दराडे यांनी केले. तसेच उत्तर भारताच्या धर्तीवर शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्याबाबत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर टीईटी संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
चौकट
गणित-विज्ञान प्रदर्शनांसाठी 1 कोटींचा निधी
